अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या शेतकर्यांना हानीभरपाई देण्यास विमा आस्थापनांकडून पंचनामे न घेणे आणि पैसे देण्यास टाळाटाळ करणे, हे आता नित्याचेच झाले आहे. त्यामुळे त्यांना नुसते धारेवर धरून विमा आस्थापनांच्या अधिकार्यांमध्ये सुधारणा होणार नाही. त्यामुळे कामचुकारपणा करणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाई केली पाहिेजे, अशी जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक
अकोला – येथील भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपच्या पदाधिकार्यांनी पीकविम्याच्या प्रश्नी जिल्हाधिकारी यांची ५ ऑगस्ट या दिवशी भेट घेतली. अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या जिल्ह्यातील शेतकर्यांना पीकविमा तातडीने मिळावा, यासाठी राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश कृषी अधिकारी, महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांना दिले होते; परंतु हानीभरपाई सर्व्हे करतांना पीक विमा आस्थापनांच्या अधिकार्यांकडून अल्प हानीचे पंचनामे कृषी कर्मचार्यांकडून करून घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. या प्रकरणी आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकार्यांच्या कक्षात कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांची बैठक घेऊन पीक विमा आस्थापनांच्या अधिकार्यांना धारेवर धरले.
अतीवृष्टी आणि पर्जन्य अशा वेळी विमा आस्थापनांचे प्रतिनिधी तक्रार प्रविष्ट करण्यासाठी उपलब्ध नव्हते. विमा आस्थापनांचे ‘पोर्टल’ बंद होते. जिल्ह्यात ‘नेटवर्क’चा खोळंबा होता, तसेच ‘टोल फ्री’ दूरभाषवरून शेतकर्यांना तक्रारी देता आल्या नाहीत. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन विमा आस्थापने, कृषी विभाग आणि महसूल विभाग यांना शेतकर्यांनी हानीविषयी लेखी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन आमदार सावरकर यांनी केले आहे.