सरकार ‘डिजिटल मीटर’ न बसवलेल्या २ सहस्र ९३४ प्रवासी टॅक्सींची अनुज्ञप्ती रहित करणार ! – मावीन गुदिन्हो, वाहतूकमंत्री

‘डिजिटल मीटर’

पणजी, ४ ऑगस्ट (वार्ता.) – गोवा शासन ‘डिजिटल मीटर’ न बसवलेल्या आणि ज्यांचा वाहन नोंदणी क्रमांक ‘०’ आणि ‘१’ पासून प्रारंभ होत आहे, अशा २ सहस्र ९३४ प्रवासी टॅक्सींची अनुज्ञप्ती (परवाना) रहित करणार आहे. या प्रवासी टॅक्सींनी २५ जुलैपर्यंतच्या समयमर्यादेत ‘डिजिटल मीटर’ बसवलेला नाही, अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी दिली.

मंत्री गुदिन्हो पुढे म्हणाले, ‘‘राज्यात वाहन नोंदणी क्रमांक ‘०’ आणि ‘१’ पासून प्रारंभ होणार्‍या एकूण ३ सहस्र ५८४ प्रवासी टॅक्सी आहेत आणि यामधील केवळ १३७ जणांनी ‘डिजिटल मीटर’ बसवला आहे, तर ५१३ जणांनी ‘डिजिटल मीटर’ बसवण्यासाठी नोंदणी केलेली आहे. उर्वरित २ सहस्र ९३४ प्रवासी टॅक्सीचालकांची अनुज्ञप्ती उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रहित करण्यात येणार आहे. वाहन नोंदणी क्रमांक ‘२’ आणि ‘३’ पासून प्रारंभ होणार्‍या प्रवासी टॅक्सींचे ‘डिजिटल मीटर’ बसवण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झालेला आहे. ’’

गोवा शासनाने पिवळ्या आणि काळ्या, तसेच ‘टुरिस्ट टॅक्सी’ यांच्या भाड्याच्या दरात प्रति किलोमीटर ३ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गुदिन्हो यांनी दिली.