परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारा ५६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेला कु. प्रभंजन विनायक चव्हाण (वय ९ वर्षे)  याची त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. प्रभंजन विनायक चव्हाण हा एक आहे !

(‘वर्ष २०१८ मध्ये कु. प्रभंजन वि. चव्हाण याची ५३ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करण्यात आली होती.’ – संकलक)

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु डॉ. आठवले)

पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. प्रभंजन चव्हाण

१. सतर्कता

अ. ‘प्रभंजन घराबाहेर जाण्यापूर्वी घरातील ‘दिवा आणि पंखे बंद आहेत ना ?’, याची नेहमी निश्चिती करतो.

आ.  पाऊस चालू झाल्यावर तो विचारतो, ‘‘आगाशीत आपले काही कपडे वगैरे नाहीत ना ?’’ एकदा पुष्कळ पाऊस येत होता. तेव्हा तो छत्री घेऊन आगाशीत गेला आणि एका गृहस्थांचे दोरीवर सुकण्यासाठी घातलेले कपडे ओले होत असल्याचे पाहून त्याने ते लगेच काढून आत ठेवले.

२. समजूतदारपणा

अ. माझा यजमानांशी कधी वाद झाला, तर तो लगेच म्हणतो, ‘‘तुम्ही भांडू नका. तुम्ही दोघे एकमेकांची क्षमा मागा.’’

आ. एकदा तो मला त्रास देत होता. त्यामुळे मी त्याला खोलीत कोंडले होते. थोड्या वेळाने त्याने माझी क्षमा मागितली. मी त्याला म्हणाले, ‘‘तू श्रीकृष्णाची क्षमा माग.’’ त्याने लगेच दंडवत घालून श्रीकृष्णाकडे क्षमायाचना केली.

सौ. विनया चव्हाण

३. चांगली निरीक्षणक्षमता

अ. त्याचे घरात आणि बाहेर नीट लक्ष असते. तो सर्व गोष्टी पुष्कळ बारकाईने पहातो. मी कधी स्वयंपाकघरात दूध तापत ठेवून बाहेरच्या खोलीत आले आणि माझे लक्ष नसले, तर तो मला त्याची आठवण करून देतो.

आ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ ग्रंथ त्याने बारकाईने पाहिला आहे.

इ. माझ्या माहेरी त्याच्या पणजीसाठी नवीन लाकडी पलंग सिद्ध केला होता. तो पाहून त्याने लगेच ‘परात्पर गुरुदेवांच्या पलंगासारखा आहे’, असे सांगितले आणि खरेच तो तसाच आहे.

ई. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी एका छायाचित्रात घातलेला पोषाख आणि माझा पोषाख सारखाच आहे’, हेही त्यानेच माझ्या लक्षात आणून दिले.

४. इतरांच्या चुका निर्भिडपणे सांगणे

एकदा माझ्याकडून दिवसा खोलीत दिवा चालू होता. तेव्हा त्याने ही चूक माझ्या लक्षात आणून दिली. एक मासापूर्वी मी स्वभावदोष निर्मूलन सत्संगात माझी चूक सांगितली होती. तेव्हा ती सांगून झाल्यावर त्याने मला लगेच ‘तीन मासांपूर्वी तुझ्याकडून दूध करपले आणि भांडे जळले होते’, ही गंभीर चूकपण तू आता सत्संगात सांगायला पाहिजे होतीस’, असे सांगितले.

५. धर्माचरणाची आवड 

कधी मी केसांना तेल न लावताच वेणी घातली की, केस सुटे होऊन ते तोंडवळ्यावर येतात. तेव्हा तो ‘हे सनातन (योग्य) नाही’, असे म्हणतो. ‘स्त्रियांनी ‘लेगिंग्ज’ (पायाला घट्ट बसणारी आणि ताणली जाणारी सलवार) घालणे आणि टिकली लावणे, हेही सनातन (योग्य) नाही’, असे तो सांगतो.

६. प्रेमभाव आणि इतरांचा विचार करणे 

६ अ. आजोबांना संतांचा सत्संग मिळावा, यासाठी प्रयत्नशील असणे : जुलै २०१९ मध्ये माझे वडील रुग्णाईत होते. तेव्हा ‘आजोबांना सगळ्यांनी भेटावे’, असे प्रभंजनला फार वाटायचे. त्या वेळी पू. परांजपेकाका (पू. सदाशिव परांजपे-श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे वडील) नामजपादी उपाय करण्यासाठी आमच्या घरी यायचे. त्यांना तो नेहमी ‘तुम्ही आजोबांना भेटाल का ? त्यांना बरे वाटेल’, असे सांगायचा आणि त्यासाठी आग्रह करायचा. एकदा पू. परांजपेकाका म्हणाले, ‘‘नक्की जाऊया.’’ त्यानंतर एकदा आजोबांच्या घरी पू. परांजपेकाका आले होते.

६ आ. पणजीविषयी प्रेमभाव असणे : माझ्या माहेरी माझी आजी (प्रभंजनची पणजी) १०० वर्षांची होती. तिला गुडघ्याच्या खाली एक पाय नव्हता. त्यामुळे ती पलंगावर (खाटेवर) सतत झोपून असायची. प्रभंजनला पणजीविषयी पुष्कळ प्रेम होते. तो तिला गाणी म्हणायला शिकवायचा. तिच्या खोड्या काढायचा आणि तिला हसवायचा. तो तिला तिची औषधे वेळेवर नेऊन द्यायचा.’

७. सात्त्विकतेची आवड

७ अ.  सात्त्विक चित्रे काढणे : त्याला चित्र काढायला सांगितल्यावर तो मंदिराचे चित्र आणि त्याच्या वरती आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे चित्र काढतो.

७ आ. सनातनच्या प्रसार साहित्याची ओढ : घरी सनातनची हस्तपत्रके आणि भित्तीपत्रके यांची सेवा आल्यावर ती ‘कधी उघडून पहातो ?’, असे त्याला वाटत असते. ती पाहिल्यावर त्याला फार आनंद होतो आणि तो लगेच ‘मी इमारतीमधील लोकांना देऊन येतो’, असे म्हणतो. तो ती पत्रके त्याच्या शाळेतील गुरुजींनाही देतो. सनातन संस्थेचे आकाशकंदील, छत्री आणि टोपी यांविषयी त्याला फार प्रेम आहे.

७ इ. भजनांची आवड : प्रभंजनला प.पू. भक्तराज महाराज यांची भजने फार आवडतात. त्याने ती एकाग्रतेने ऐकून पाठ केली आहेत. तो सतत ती गुणगुणत असतो. आम्ही चारचाकीने प्रवास करत असलो, तर तो प्रवासात जाता-येता भजने लावण्याचा आग्रह करतो. भजनांमुळे त्याला प.पू. रामानंद महाराज यांची ओळख झाली. ’  – सौ. विनया चव्हाण (चि. प्रभंजनची आई), जत

७ ई. प्रार्थनेच्या वेळा पाळणे : तो परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या प्रार्थनेच्या वेळांचे आठवणीने पालन करतो आणि आम्हालाही आठवण करून देतो. तो ती प्रार्थना म्हणतो आणि आम्ही त्याच्या मागून म्हणतो. त्याच्या शाळेतील अभ्यासाच्या तुलनेत त्याची भजने आणि प्रार्थना लवकर पाठ होतात.

८.  संतांप्रती भाव

श्री. विनायक चव्हाण

‘सांगलीहून बुधवारी पू. परांजपेआजोबा नामजपादी उपाय करण्यासाठी जतला यायचे. नामजपाची वेळ दुपारची असल्याने तो मला ‘शाळेतून घरी आण’, असे सांगायचा. एखाद्या बुधवारी शाळेला सुट्टी असेल, तर त्याला नामजपाला जाता येणार असल्याने त्याला पुष्कळ आनंद व्हायचा.’

– श्री. विनायक चव्हाण (चि. प्रभंजनचे वडील), जत

९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा भाव

९ अ. रामनाथी आश्रम आणि परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्या दर्शनाची ओढ असणे : ‘अधूनमधून केव्हातरी आम्ही मिरज आश्रमात जातो. तेथे जिन्यातून जातांना समोरच्या भिंतीवर रामनाथी आश्रमाचे मोठे छायाचित्र लावलेले आहे. ते पाहून तो सर्वांना सांगायचा, ‘आम्ही रामनाथीला जाणार आहोत.’ तो रामनाथी आश्रमात जाण्यासाठी सतत मागे लागायचा. मी त्याला समजावून सांगायचे, ‘‘अरे, आपल्याला साधक सांगतील, तेव्हाच आपण जायचे.’’ तेव्हा तो म्हणायचा, ‘‘मी त्यांनाच (साधकांनाच) भ्रमणभाष करून विचारतो.’’ आश्रमाचे छायाचित्र बघून तो विचारायचा, ‘‘प.पू. डॉक्टर कुठे रहातात ? त्यांचा दिनक्रम कसा असतो ?’’ अशी सर्व माहिती विचारायचा. प्रत्यक्षात आम्ही रामनाथी आश्रमात जाऊन आल्यावरच त्याला समाधान वाटले.

९ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र आवडणे : त्याच्या बोलण्यात गुरुदेव, साधक आणि साधना हेच विषय अधिक असतात. तो इतर काही फारसे बोलत नाही. मिरज आश्रमात त्याला पू. जोशीआजोबांना (पू. जयराम जोशी यांना) भेटण्याची ओढ असते. त्यांच्या खोलीतील गुरुदेवांचे छायाचित्र त्याला फार आवडते. मी एकदा ‘संतांना ते छायाचित्र मिळते’, असे त्याला सांगितले होते. कधीतरी त्याला त्या छायाचित्राची पुष्कळ आठवण येते आणि तो मला म्हणतो, ‘तू, मी, बाबा आणि आजी लवकर संत होऊया, म्हणजे आपल्याला तसे छायाचित्र मिळेल.’

१०. प्रभंजनला होणारे आध्यात्मिक त्रास

प्रभंजन भजने ऐकतो; पण तो आध्यात्मिक उपायांसाठी असलेले परात्पर गुरु पांडे महाराज यांचे मंत्रजप ऐकत नाही. त्याला सदरा (झब्बा) आणि पायजमा घालायला आवडत नाही. तो एखाद्या कार्यक्रमापुरता ते बलपूर्वक घालतो आणि कार्यक्रम झाल्यावर लगेच काढतो. त्याच्या गळ्यात घातलेला उपायांचा दोरा सारखा तुटून पडतो. तो कपाळाला नाम (टिळा) क्वचितच लावतो. तो अनेकदा क्षुल्लक कारणांस्तव रडतो.

११. स्वभावदोष

काही गोष्टींत हट्टीपणा, ऐकण्याची वृत्ती नसणे, अनावश्यक बोलणे, राग येणे, खोटे बोलणे आणि खोडकरपणा.

१२. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘हे गुरुमाऊली, केवळ आपल्याच कृपेमुळे मी ही सूत्रे लिहू शकले. माझी पात्रता नसतांना तुमच्या कृपेमुळे ही सेवा मिळाली, यासाठी मी कोटीश: कृतज्ञ आहे.’

‘प्रभंजनचे संगोपन करण्यात मी अल्प पडत आहे. ‘त्याचा सांभाळ तुम्हाला अपेक्षित असा तुम्हीच करवून घ्या. हे सर्व करण्यासाठी मला बळ, शक्ती आणि चैतन्य द्या. आम्हाला सतत तुमच्या चरणी ठेवा, हीच प्रार्थना !’

– सौ. विनया चव्हाण (चि. प्रभंजनची आई), जत, सांगली   (११.७.२०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.