अखेर अकलूज नगरपरिषद आणि नातेपुते नगर पंचायत म्हणून घोषित !

नातेपुते (जिल्हा सोलापूर) – अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते येथे नगरपंचायत स्थापन करण्याची अधिसूचना राज्य सरकारचे उपसचिव सतीश मोघे यांनी राज्यपालांच्या स्वाक्षरीसह काढली आहे. ३ सप्ताहात याविषयी अध्यादेश काढावा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १७ जुलै या दिवशी दिले होते. हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी मागील ४३ दिवस अकलूज येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण चालू होते.

याविषयी १९ सप्टेंबर २०१९ या दिवशी पहिला अध्यादेश निघाला होता. त्यानंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाल्याने अकलूज नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायत यांचा प्रश्‍न प्रलंबित राहिला होता. अकलूज आणि नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने अधिवक्ता अभिजित कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.