‘झिका’ विषाणूचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळला !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुरंदर (जिल्हा पुणे) – जगभरात थैमान घातलेल्या ‘झिका’ विषाणूचा शिरकाव पुरंदर तालुक्यातील (जिल्हा पुणे) गावात झाला असून तेथील ५० वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या (एन्.आय.व्ही.) तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील गावांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे. साडेतीन सहस्र लोकसंख्या असलेल्या बेलसर गावात तापाचे रुग्ण आढळून येत होते. त्यातील काही नमुने एन्.आय.व्ही.कडे पाठवल्यावर काहींना चिकनगुनिया आणि डेंग्यू यांचा आजार असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. झिका विषाणूची लक्षणे असलेल्या महिलेलाही चिकनगुनियाची बाधा झाली असून हा मिश्र विषाणू संसर्ग असल्याची माहिती राज्य रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. राज्य प्रतिसाद पथकाच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही चालू केल्याचेही त्यांनी सांगितले.