बलात्कार पीडितेशी विवाह करण्याच्या दोषी पाद्य्राच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

  • कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची सूचना

  • पाद्री भोगत आहे २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

२० वर्षांच्या शिक्षेत यामुळे सूट मिळेल, असा विचार करून पाद्री पीडितेशी विवाह करण्याचा प्रयत्न करत आहे, हेच यातून लक्षात येते !

नवी देहली – केरळमधील कोट्टियूर येथील ४९ वर्षीय कॅथॉलिक पाद्री रॉबिन वडक्कमचेरी याने २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्यानंतर पीडितेशी विवाह करण्याची अनुमती मागणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच पाद्री रॉबिन याने पीडितेशी विवाहाकरता जामीन देण्याची मागणी करणारी स्वतंत्र याचिकाही फेटाळण्यात आली आहे. पाद्री रॉबिन याला या प्रकरणी केरळमधील न्यायालयाने २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पीडिता अल्पवयीन असतांना त्याने तिच्यावर बलात्कार केला होता आणि त्यातून मूल जन्माला आले.

पीडितेने केरळ उच्च न्यायालयात पाद्री रॉबिन याच्याशी विवाह करण्याची अनुमती मागणारी याचिका प्रविष्ट केली होती. ती न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात रॉबिन याच्याकडून विवाहाची अनुमती मागणारी याचिका करण्यात आली. यावर न्यायालयाने म्हटले की, उच्च न्यायालयाने याविषयी विचारपूर्वक निर्णय घेतला असून त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. याविषयी कनिष्ठ न्यायालयात दाद मागावी.