सामाजिक माध्यमांद्वारे महिलांच्या छेडछाड प्रकरणी पुणे ‘सायबर सेल’कडे २०२ तक्रारींची नोंद !

महिलांनी यातून धडा घेऊन सामाजिक माध्यमांद्वारे मैत्री करण्यावर किती विश्वास ठेवायचा हे लक्षात घ्यावे ! – संपादक

पुणे, २ ऑगस्ट – सामाजिक माध्यमांद्वारे अनेकजण स्वत:चे छायाचित्र, वैयक्तिक माहिती, भ्रमणभाष क्रमांक ‘अपलोड’ करतात. त्याचा अपलाभ घेत महिलांना अश्लील संदेश आणि छायाचित्र पाठवणे, त्यांना ब्लॅकमेल करणे, ‘व्हिडिओ कॉल’ करणे या घटनांमध्ये प्रतिदिन वाढ होत आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये पिंपरी-चिंचवड ‘सायबर सेल’कडे २०२ तक्रारी नोंद झाल्या आहेत; मात्र अनेकदा अपकीर्तीच्या भीतीने महिला तक्रार देण्यासाठी समोर येत नाहीत, अशी माहितीही पोलिसांनी दिली. (महिलांनी निर्भय होऊन त्रास देणार्‍या नराधमांना शिक्षा होण्यासाठी पुढे येणे ही काळाची आवश्यकता आहे, हे लक्षात ठेवून पोलिसांचे साहाय्य घ्यावे. असे पाऊल उचलल्याविना महिलांवरील अत्याचार बंद होणार नाहीत. – संपादक)

कामगारांच्या भ्रमणभाषवर ‘व्हॉट्सॲप’ चालू करून त्याद्वारे महिलांना ‘व्हिडिओ कॉल’ करणे, अश्लील संदेश पाठवणे असे प्रकार केले जातात. सामाजिक माध्यमांवर मैत्री त्यानंतर प्रेम आणि मग विवाहाचे आमीष दाखवले जाते. त्यानंतर अश्लील व्हिडिओ सिद्ध करून छळ केला जातो.

‘सायबर सेल’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार यांनी सांगितले, सामाजिक माध्यमावर सायबर गुन्हेगारीशी संबंधित कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास महिलांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी. खासगी गोष्टी सामाजिक माध्यमावर पोस्ट किंवा शेअर करू नयेत. सामाजिक माध्यमावरील आपले अकाउंट लॉक (संरक्षित) करावे.