सकाळी श्रीविष्णु, श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी यांचे स्मरण होणे अन् दुपारी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये  या तिन्ही देवतांचा नामजप करावा’, अशी सूचना वाचली आणि गुरुमाऊलीप्रती कृतज्ञता वाटली.

श्री. महेंद्र सहस्रबुद्धे

‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात प्रतिदिन सकाळी ९ वाजता ध्वनीक्षेपकावर ‘श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र’ लावण्यात येते. तेव्हा मी ते ऐकण्यासमवेत म्हणण्याचाही प्रयत्न करतो. २४.५.२०२० या दिवशी हे स्तोत्र म्हणण्यापेक्षा ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप करण्याचा विचार माझ्या मनात आला; म्हणून मी स्तोत्र पूर्ण होईपर्यंत ‘श्री विष्णवे नमः ।’, असा नामजप केला.

नंतर ‘भ्रमणभाषवरील ‘व्हॉट्सॲप’वर काही निरोप आले आहेत का ?’, हे पहाण्यासाठी मी ‘व्हॉट्सॲप’ उघडले. अकस्मात् एका साधकाच्या ‘व्हॉट्सॲप’वरील ‘डीपी’कडे माझे लक्ष वेधले गेले. त्याने ‘डीपी’वर रामनाथी आश्रमातील ऋद्धि-सिद्धिसह श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे छायाचित्र ठेवले होते. तेव्हा माझ्याकडून ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ असा नामजप थोडा वेळ झाला. हा नामजप करतांना ‘रामनाथी आश्रमातील श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे चित्र एखाद्या साधकाने ‘डीपी’वर ठेवले आहे का ?’, हे पहाण्याचा विचार माझ्या मनात तीव्रतेने येऊन मी ते शोधले; परंतु ते कुणीही ‘डीपी’वर ठेवल्याचे मला आढळले नाही; परंतु पूर्वी पाहिलेली मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर काही क्षण स्पष्टपणे दिसली. माझ्या मनात विचार आला, ‘श्री भवानीदेवीचे चित्र पहावेसे का वाटले ?’

नंतर मी अन्य नामजपादी उपाय आणि सत्सेवा करतांना हे सूत्र विसरलो. त्या दिवशी दुपारी १.४५ वाजता सहसाधकाने मला दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये नामजपाची चौकट प्रसिद्ध झाल्याचे सांगितले. त्या चौकटीमध्ये ‘साधकांनी सध्याच्या काळानुसार ‘श्री विष्णवे नमः ।’, ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ आणि ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’, हे नामजप करावे’, अशी सूचना होती. ही सूचना वाचल्यावर मला ‘सकाळी स्तोत्र ऐकतांना आपोआप ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप होणे, नंतर श्री सिद्धिविनायकाच्या चित्राकडे मन आकर्षित होणे आणि तद्नंतर श्री भवानीदेवीचे चित्र पहावेसे वाटणे, याचा उलगडा झाला.

मला ही पूर्वसूचनास्वरूप अनुभूती घेता आली, यासाठी मी परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’ – श्री. महेंद्र सहस्रबुद्धे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.५.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक