प्रवेशासाठी सातत्याने पालटणार्या नियमांमुळे प्रवासी त्रस्त
कोल्हापूर, १ ऑगस्ट – महाराष्ट्रातून बेळगाव (कर्नाटक) प्रवेशासाठी आता ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. या पूर्वी ज्यांनी कोरोना प्रतिबंधक एक लस घेतली आहे, त्यांना प्रवेश दिला जात होता; मात्र अचानक कालपासून नवीन आदेशान्वये केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांतून येणार्या प्रवाशांना ७२ घंट्यांमधील ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. ज्यांना अगदी तातडीचे काम आहे, त्यांना कोगनोळी नाक्यावरच ‘रॅपीड अँटीजेन’ चाचणीची सोय करण्यात आली आहे.
अचानक निर्णय घोषित केल्याने अनेकांकडे चाचणी अहवाल नसल्याने परत फिरावे लागले. आता विमान, रेल्वे, बस किंवा खासगी वाहन अशा कोणत्याही मार्गाने राज्यात प्रवेश करणार्यांना चाचणीचा ‘निगेटिव्ह’ अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. कर्नाटक सरकार राज्यात प्रवेशासाठी सातत्याने नियम पालटते आणि ते ऐनवेळी घोषित करते त्यामुळे प्रवाशांना वारंवार मनस्तापास सामोरे जावे लागते.