वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अमरावती येथील साधकांनी गुरुपादुका मस्तकावर ठेवून अनुभवलेली गुरुभक्तीची ‘ऑनलाईन’ वैकुंठवारी !

‘वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेपूर्वी साधकांचे भावजागृतीचे प्रयत्न वाढावेत’, यासाठी जळगाव येथील साधकांनी पहाटे लवकर उठून ‘ऑनलाईन’ वारी काढायचे ठरवले. ही वारी गुरुपौर्णिमेला रामनाथी आश्रमात पोचण्याचे नियोजन करण्यात आले होते. पंढरपूरला जातांना वारकरी जशी भजने वा जयघोष करत जातात, तशा शब्दांत या वारीत भावप्रयोग घेतला जात होता आणि त्या दिवसापुरता एखादा स्वभावदोष निवडून त्याच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करण्याचे ध्येयही घेतले जात होते. काही साधक स्वभावदोषांचे निर्मूलन आणि भावजागृती यांसाठी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न सांगायचे. अर्धा ते पाऊण घंट्याच्या या उपक्रमामुळे साधकांचे स्वभावदोष निर्मूलनाचे प्रयत्न वाढले आणि भावप्रयोग अन् अन्य साधकांचे भावजागृतीचे प्रयत्न ऐकून सर्व साधकांची भावजागृती होऊ लागली. यात संभाजीनगर येथील साधकही सहभागी होत होते.

श्री गुरुपादुका

१. सौ. मनीषा पोहनकर यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या जिल्ह्यात वारीचा उपक्रम राबवल्याचे सांगणे, त्यानुसार अमरावती येथेही तसा उपक्रम राबवला जाणे

अमरावतीच्या साधिका सौ. मनीषा पोहनकर यांचे आई-वडील सौ. शोभा आणि श्री. मधुकर देशमुख संभाजीनगर येथे रहातात. ते या वारीत प्रतिदिन सहभागी व्हायचे. त्यांनी हा उपक्रम सौ. मनीषाला सांगितला. २१.६. ते ५.७.२०२० पर्यंत पंधरा दिवस अमरावतीतही हा उपक्रम चालू झाला. या उपक्रमाला जोडून अमरावती येथील साधकांनी दुर्गादेवी, दत्त आणि शिव यांचा सामूहिक नामजप करण्याचे निश्चित केले. त्यासाठी साधकांनी पहाटे ४ वाजता उठायची सिद्धता दर्शवली.

२. अमरावतीच्या साधकांनी अनुभवलेली वैकुंठवारी !

२ अ. साधकांनी घेतलेले ध्येय : सर्व साधक वैकुंठलोकात आहेत आणि गुरुभक्तीची ही वारी रामनाथीला घेऊन जात आहोत. गुरुमाऊलीने मोक्षाचे द्वार उघडून ठेवले आहे. ‘एकेक स्वभावदोष घालवत साधक-फूल बनून गुरुपौर्णिमेला गुरूंच्या चरणांवर समर्पित व्हायचे आहे’, असे ध्येय सर्वांनी घेतले.

२ आ. वैकुंठवारीची रूपरेषा : साधक प्रतिदिन पहाटे ४.१५ ते ५ वाजून ३५ मिनिटांपर्यंत दुर्गादेवी, दत्त आणि शिव यांचा एक माळ जप करत. त्यानंतर प्रार्थना, श्रीकृष्णाचा श्लोक, शंखनाद केला जायचा आणि नंतर भावप्रयोग घेण्यात येत असे. सर्व आध्यात्मिक स्तरावरील उपाय करून देवतांचा आशीर्वाद घेऊन गुरूंच्या पादुका मस्तकावर ठेवून गुरुभक्तीच्या वारीला आरंभ होत असे.

२ इ. वैकुंठवारीचा मार्ग

सौ. मनीषा पोहनकर

२ इ १. वारीच्या आरंभी अमरावतीची ग्रामदेवता श्री अंबादेवी आणि एकवीरादेवी यांचे दर्शन घेऊन वैजनाथमार्गे परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुलदेवीचे, अंबेजोगाई येथील श्री योगेश्वरीदेवीचे दर्शन घेऊन पूजा करणे अन् तिला भावपूर्ण प्रार्र्थना करणे : पहिल्या दिवशी वारीचा आरंभ अमरावतीची ग्रामदेवता श्री अंबादेवी आणि एकवीरादेवी यांचे दर्शन घेऊन झाला. त्यानंतर परळी वैजनाथमार्गे परात्पर गुरु डॉक्टरांची कुलदेवता असलेल्या अंबेजोगाई येथील श्री योगेश्वरीदेवीचे दर्शन घेऊन साधकांनी तिथे मुक्काम केला. दुसर्‍या दिवशी साधकांनी योगेश्वरीदेवीची भावपूर्ण पूजा केली आणि ‘तू आमच्या परात्पर गुरुमाऊलीची कुलदेवता आहेस. आमच्यातील स्वभावदोष आणि अहं नष्ट करून आम्हाला गुरूंच्या चरणांपर्यंत रामनाथीला घेऊन जा. राष्ट्र्र अन् धर्म जागृतीचे कार्य तूच आमच्याकडून करवून घे ’, अशी प्रार्र्थना केली.

२ इ २. वैकुंठवारीचा पुढील टप्पा – तुळजापूर येथील श्री भवानीमातेचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघणे : वारी पुढे तुळजापूर येथील श्री भवानीमातेचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाली. विठ्ठलाच्या चरणांना स्पर्श करून त्याचे आशीर्वाद घेऊन चैतन्य, सात्त्विकता आणि आनंद यांची अनुभूती घेतली.

२ इ ३. वैकुंठवारी पुढच्या विविध देवस्थानांना भेटी देत प्रतिदिन पुढील प्रवासाला निघत असे.

२ ई. गुरुभक्तीच्या या वारीतील प्रत्येक दिवशी साधनेसाठी करावयाचे प्रयत्न

२ ई १. पहिला दिवस : पहिल्याच दिवशी ‘अपेक्षा करणे’, या अहंच्या पैलूची निवड करून दिवसभर या पैलूकडे लक्ष देण्याचे ध्येय घेण्यात आले आणि त्यासाठी केलेले प्रयत्न दुसर्‍या दिवशीच्या वारीत सांगायचे ठरले.

२ ई २. दुसरा दिवस : अपेक्षेचे ऊन आणि प्रतिमेचे काटे दूर करायचे ध्येय घेतले होते. त्यासाठी शरणागतीने याचना करत प्रयत्न करण्याचे ठरले.

२ ई ३. तिसरा दिवस

‘पाऊले चालती रामनाथीची वाट,
दोष आणि अहं बंधनांची सोडूनिया गाठ ।
ध्यानी, मनी, चित्ती अखंड असावे तुझे नाम ।।

तुझ्यामध्ये आमचा ‘कर्तेपणा’ नष्ट व्हावा ।
अस्तित्व माझे न उरावे ।
कर्तेपणा विसरून, देहभान हरपून श्रीरंगाच्या रंगात रंगून जावे ।।’

असा गजर करत ‘कर्तेपणा’ हा अहंचा पैलू दूर करण्याचे ध्येय घेण्यात आले.

२ ई ४. चौथा दिवस

‘टाळी वाजवावी, पताका घेऊन हिंदु राष्ट्र्राची वाट चालावी ।
सच्चिदानंद, परब्रह्म अशा गुरुमाऊलीला घालीता लोटांगण ।
होते आपुल्या पापांचे क्षालन ।।’

असे म्हणत स्वकौतुकाच्या विचारांवर मात करायचे निश्चित केले. कुणीही कौतुक केले, तर ‘ते माझ्या गुरुमाऊलीचे आहे’, असा भाव ठेवला.

२ ई ५. पाचवा दिवस : या दिवशी असा भाव ठेवला,

‘जयाचिये चित्ती असे माझा हरि, काय कुठली चिंता आता ।
करण्या भवसागर पार, आळवूनिया श्रीरंगा
गाऊ भक्तीचा महिमा ।।

ठेवूनी सातत्य, चिकाटीने करू प्रयत्न ।
अन् घालवूया मनातील ‘पूर्वग्रह’रूपी मळ ।।’

२ ई ६. सहावा दिवस : माझ्या हरीला पहाण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता आर्ततेने शरण जाऊन हरीचा दास बनूया. ‘त्यासाठी साधना करतांना कुठे कुठे ‘आळस’ करतो, प्रायश्चित्त घेण्यात ‘सवलत’ घेतो, याचे चिंतन करून प्रत्येक कृती तत्परतेने करायची आहे’, असे ध्येय घेतले.

२ ई ७. सातवा दिवस : हरीचे रूप पहाण्यासाठी आमची लोचने आतुर झाली आहेत. हरि दिसला नाही, तेव्हा शरण जाऊन क्षमायाचना केली. तत्क्षणी प्रत्येक साधकात माझ्या गुरुमाऊलीचे रूप दिसले. ‘प्रत्येक साधकच मला हरिसारखा आहे’, या भावाने स्वकोषातून बाहेर पडून आणि ‘इतरांचा विचार करणे’ हा दैवी गुण आत्मसात करण्याचे ठरले.

२ ई ८. आठवा दिवस : गुरूंच्या प्रीतीसागरात डुंबून सर्वांप्रती प्रेमभाव वाढवून मन आणि अंतःकरण शुद्ध करून आत्मसमर्पण करणे, असे ध्येय घेतले होते.

२ ई ९. नववा दिवस : एकमेकांविषयीचे पूर्वग्रह नष्ट करून प्रीती निर्माण करण्याचे ध्येय घेतले होते.

२ ई १०. दहावा दिवस : गुरुपौर्णिमेला पाच दिवस शेष होते. तेव्हा समर्थ रामदास स्वामींसारखी ‘घेऊन झोळी, मागूया अर्पणरूपी भिक्षा, तेव्हाच गळून पडेल अहं, तरच पात्र होऊ गुरुकृपेला ।’ या भावाने अर्पणासाठी प्रयत्न करायचे ठरले.

२ ई ११. अकरावा दिवस

‘कैसी करू अर्पण कृतज्ञता तव चरणी गुरुराया ।
क्षणोक्षणी अंतरात अखंड राहू दे कृतज्ञतेचा झरा ।।’

अशा भावाने गुरूंप्रती कृतज्ञ रहाण्याचे ध्येय घेतले.

२ ई १२. बारावा दिवस : या दिवशी स्वतःमध्ये सकारात्मक पालट घडवून गुरूंच्या समष्टी रूपाशी एकरूप होऊन समष्टी साधनेसाठी झोकून देऊन सेवा करण्याचे ध्येय घेतले होते.

२ ई १३. तेरावा दिवस : ‘माऊली माऊली’ होता नामाचा गजर, ओढ लागली देवा समर्पित होण्यास्तव, प्रार्थना करूनी आणि गुरूंना शरण जाऊनी वाढवूया अखंड तळमळ मनी’, असा भाव ठेवून ‘तळमळ’ हा गुण वाढवण्याचे निश्चित झाले.

२ ई १४. चौदावा दिवस : हृदयात विराजमान असलेल्या गुरुमाऊलीला आर्ततेने हाक मारून शरण जाऊया, क्षमायाचना करूया आणि गुर्वाज्ञेचे पालन करूया. ‘करूनी आज्ञापालन होऊया दास श्रीहरीचे, नामात रंगून अंतरंगी सजवू भक्तीचे रंग ।’

२ ई १५. पंधरावा दिवस : हा दिवस गुरुपौर्णिमेचा होता. या दिवशी कु. शताक्षी पोहनकर हिने भावप्रयोग घेतला. (भावप्रयोग वरील चौकटीत दिला आहे.)

३. गुरुभक्तीच्या ‘ऑनलाईन’ वैकुंठवारीमुळे साधकांमध्ये झालेले पालट

विदर्भातील २०० साधक या वारीत प्रतिदिन पहाटे सहभागी होत होते.

अ. साधकांना पहाटे लवकर उठण्याची सवय लागली.

आ. वारीपूर्वी कोरोनाविरुद्ध आध्यात्मिक बळ वाढण्यासाठी करायचा श्री दुर्गादेवी, दत्त आणि शिव यांचा नामजप भावपूर्ण होत असे.

इ. साधकांचे व्यष्टी साधनेचे, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे, तसेच गुणसंवर्धनाचे प्रयत्न वाढले.

ई. साधकांमध्ये प्रेमभाव निर्माण होण्यास साहाय्य झाले.

उ. साधकांना दिवसभरात अधिक वेळ भावस्थिती अनुभवता आली.

४. कृतज्ञता

साधकांना गुरूंच्या कृपेने वैकुंठ वारीसाठी प्रतिदिन नवीन कल्पना सुचत होत्या. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी या लेखाचे लिखाण माझ्याकडून करवून घेतले’, त्याविषयी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. मनीषा गजानन पोहनकर, अमरावती (२७.७.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक