चिखली (जिल्हा कोल्हापूर) – दोन वर्षांपूर्वी महापूर येऊन गेल्यानंतर चंद्रकांत पाटील आले होते. आता तुम्ही आला आहात, याच मारुति मंदिरात आमच्यासाठी काहीतरी करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र आमच्याकडे दोन वर्षे कुणीच पाहिले नाही. आम्हाला आश्वासन दिल्यावर २ वर्षे प्रशासन कुठे होते ? असे चिखली येथील एका ग्रामस्थांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना म्हटले.
देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ३० जुलैला चिखली गावात पूरपरिस्थितीची पहाणी केली. गावकर्यांशी संवाद साधला. त्यानंतर हे तिन्ही नेते मारुतीच्या मंदिरात आले. मंदिर आणि मंदिराबाहेरही ग्रामस्थ उभे होते. मंदिरात देवेंद्र फडणवीस जेव्हा बोलायला उभे राहिले, तेव्हा खिडकीतून एका व्यक्तीने पोटतिकडीने वरील फडणवीस यांना उद्देशून वरील उद्गार काढले.
हे ग्रामस्थ पुढे म्हणाले, ‘‘तुम्ही आश्वासन देणार आणि परत जाणार. आदित्य ठाकरेसाहेब आले होते. त्यांनीही पाहिले नाही. आम्ही आमच्या कामाला लागणार, तुम्ही तुमच्या कामाला लागणार. परत कुणी आमच्याकडे बघणार नाही. हे मी आता तुम्हाला उघड इथेच सांगतो.’’