पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्याविषयी पू. शिवाजी वटकर यांनी लिहिलेला लेख आणि कविता दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित झाल्यावर त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘बहुतेक सर्वच लेखकांत अहंभाव असतो. पू. शिवाजी वटकर स्वतः संत असल्यामुळे त्यांच्यात अहंभाव नाही. त्यामुळे त्यांना ‘मी लेख लिहिला’, असे कधीच वाटत नाही. त्यामुळे मला आणि इतर साधकांना लेख अप्रतिम असल्याचे जाणवले. त्याविषयी मी त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जिज्ञासा म्हणून पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्याविषयी लेख आणि कविता लिहिणे

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

‘पू. (सौ.) अश्विनी पवार (पू. अश्विनीताई) २७ व्या वर्षी संतपदी आरुढ झाल्या. वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेला वयाच्या ३० व्या वर्षी त्यांची आध्यात्मिक पातळी ७६ टक्के होती. (वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेला त्यांची आध्यात्मिक पातळी ७७ टक्के झाली आहे.) ‘एवढ्या लहान वयात त्यांनी साधनेत एवढी प्रगती कशी काय केली ? आणि त्या देवद आश्रमात समष्टी सेवा व्यापक स्तरावर कशी काय करू शकतात ?’ याविषयी मला जिज्ञासा होती. माझा त्यांच्याशी तसा सेवेविषयी संबंध येत नाही. मी एप्रिल ते जुलै २०२० या ४ मासांत पाठीच्या दुखण्याने अंथरुणाला खिळून होतो. त्या वेळी काही प्रसंगांत मला पू. ताईंकडून थोडेफार शिकता आले. मी त्यांना सप्टेंबर २०२० मध्ये जिज्ञासा म्हणून काही गोष्टी विचारून घेतल्या. त्यांची अद्वितीय सेवा आणि आध्यात्मिक स्तरावर चाललेले गुरुकार्य कळल्यावर मला आश्चर्य वाटले. मला जे अल्पसे शिकायला मिळाले, ते इतरांनाही मिळावे आणि त्यातून आनंद मिळावा यासाठी मी गुरुकृपेने ६.१०.२०२० या दिवशी त्यांच्याविषयी एक लेख अन् एक कविता लिहिली. ११.१२.२०२० या पू. ताईंच्या वाढदिवसानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये तो लेख आणि कविता प्रकाशित झाली. यातून मला गुरुकृपेने पुढील सूत्रे शिकता आली. ती मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करत आहे.

पू. शिवाजी वटकर

१. गुरुकृपेने संधी मिळूनही शिकण्यास अल्प पडणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी मला आश्रमात मागील १० वर्षे आश्रय देऊन साधक, संत, सद्गुरु, चैतन्यमय वस्तू आणि सुंदर परिसर यांचा सत्संग दिला आहे. यातून त्यांनी मला शिकण्याची संधी दिली असतांनाही माझ्यातील संकुचितपणा आणि ‘मला येते’ या स्वभावदोषांमुळे मी शिकण्यास अल्प पडत आहे.

२. लेख आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेल्या कौतुकोद्गारातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रीती अनुभवणे : ११.१२.२०२० या दिवशी प्रसिद्ध झालेल्या या लेखासमवेत एक चौकट प्रकाशित झाली. त्यामध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी लिहिले होते, ‘या लेखमालेमुळे पू. (सौ.) अश्विनी यांनी ‘एवढ्या लहान वयात साधनेत एवढी प्रगती कशी केली ?’, हे माझ्या लक्षात आले. याविषयी पू. वटकर यांचे आभार मानावे, तेवढे थोडेच आहेत.’ हे वाचून मी आश्चर्यचकित झालो. ‘स्वतःच्या अपंग मुलाने अपंगत्वावर मात करण्यासाठी कणभर प्रयत्न केले, तरी त्या मुलाच्या आईला मणभर आनंद होऊन ती त्याचे कौतुक करते’, तसेच आमच्या गुरुमाऊलीचे आहे.

३. ‘लेख वाचून आनंद झाला’, असे मला साधकांनी सांगितले, तेव्हा ते ‘पू. अश्विनीताई यांच्यातील चैतन्याचे कौतुक करत आहेत आणि त्यांचे चैतन्यच साधकांना आनंद देत आहे’, असे वाटले.

४. पू. (सौ.) अश्विनीताई ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ असल्यानेच लेख सुंदर होणे : काही साधक मला म्हणाले, ‘‘लेख सुंदर आहे.’’ त्या वेळी मी त्यांना सांगितले, ‘‘पू. अश्विनीताई ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ आहेत’, यामुळे लेख सुंदर झाला आहे.’’ ‘साधकही सुंदर आहेत आणि त्यांची शिकण्याची वृत्ती आहे’, म्हणून ते असे म्हणत होते.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ आणि चैतन्यमय शिव असल्याने लेखात चैतन्य येणे : लेख लिहून घेणारे परात्पर गुरु डॉक्टर हे किती ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ आहेत’, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ते स्वतःच शिव आहेत. त्यांच्या दृष्टीक्षेपामुळे लेखामध्ये प्राणप्रतिष्ठा होऊन जिवंतपणा आणि चैतन्य आले. यामुळे ‘लेख आनंददायी झाला’, असे मला वाटते. ‘ते चैतन्याचे वर्णन होते आणि साधकही चैतन्याचे कौतुक करत होते’, असे वाटले. यामुळे माझ्या मनात लेख लिहिल्याविषयी ‘कर्तेपणा किंवा कौतुकाची अपेक्षा करणे’, याविषयी विचार आले नाहीत.’

– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.१२.२०२०)