‘पेगॅसस’ हेरगिरी प्रकरणावरून लोकसभेत विरोधकांचा गदारोळ !

सातत्याने गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज होऊ न देणार्‍या जनताद्रोही लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व सरकारने कायमचे रहित करावे, अशी जनतेची मागणी आहे !

नवी देहली – ‘पेगॅसस’ नावाची संगणकीय प्रणाली वापरून महनीय व्यक्तींचे दूरभाष ‘टॅप’ केल्याच्या प्रकरणावरून लोकसभेत २८ जुलै या दिवशीही विरोधकांनी गोंधळ घातला. या वेळी विरोधकांनी कागदपत्रे इतस्ततः फेकली आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणबाजी केली. यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी साडेबारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही ठिकाणी विरोधकांनी गदारोळ घातला. २८ जुलै हा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आठवा दिवस होता. गेल्या काही दिवसांपासून ‘पेगॅसस’ प्रकरणावरून संसदेत गदारोळ चालू आहे.

‘पेगॅसस’ हेरगिरी प्रकरणी विरोधी पक्षांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना जाब विचारत आहेत. विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, पेगॅसस हेरगिरी प्रकरणी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. याप्रकरणी काँग्रेससह १४ विरोधी पक्षांकडून सरकारला नोटीस दिली जाईल. दुसरीकडे सरकारचे म्हणणे आहे की, विरोधकांची चर्चा करण्याची किंवा सभागृहाचे कामकाज चालू देण्याची इच्छा नाही.