अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर चीनविरोधी कारवायांसाठी होऊ देणार नसल्याचे सांगत तालिबानची चीनशी हातमिळवणी !

तालिबानी आतंकवाद्यांनी चीनमध्ये जाऊन घेतली परराष्ट्रमंत्र्यांची भेट !

तालिबान आणि चीन यांच्यात मैत्री झाल्याचे त्याचे वाईट परिणाम भारताला भोगावे लागतील, हे लक्षात घेऊन डावपेच आखणे महत्त्वाचे !

तालिबानी आतंकवाद्यांनी चीनमध्ये जाऊन घेतली परराष्ट्रमंत्र्यांची भेट

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमधील तालिबानी आतंकवाद्यांचा गट मुल्ला अब्दुल गनी बरादर याच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये गेला आहे. तेथे या आतंकवाद्यांच्या शिष्टमंडळाने चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेतली. मुल्ला बरादर याने चीनला, ‘अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कोणत्याही देशाच्या सुरक्षेच्या विरोधात होऊ देणार नाही’, असे विधान चीनला उद्देशून केले. या भेटीच्या काही दिवसांपूर्वी पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी आणि आय.एस्.आय.चे प्रमुख फैज हामिद यांनी चीनमध्ये जाऊन वांग यी यांची भेट घेतली होती. (पुढे चीन, पाक आणि तालिबान यांनी एकत्र येऊन भारतविरोधी कारवाया केल्याचे समोर आल्यास आश्‍चर्य वाटायला नको ! – संपादक)

१. तालिबानने चीनच्या शिंजियांग प्रांताशी सीमा असणार्‍या अर्ध्याहून अधिक भागावर नियंत्रण मिळवले आहे. ‘तालिबानी शिंजियांग प्रांतामध्ये घुसखोरी करून तेथील उघूर मुसलमानांना साहाय्य करील’, अशी चीनला भीती वाटत आहे.

२. चीनने तालिबानी आतंकवाद्यांना, ‘तालिबान्यांनी सर्व आतंकवादी संघटनांशी असलेले संबंध संपुष्टात आणावेत’, असे स्पष्टपणे सांगितले. यात अल् कायदा पुरस्कृत उघूर मुसलमानांची बंडखोर संघटना इ.टी.आय.एम्. (इस्ट तुर्कस्तान इस्लामिक मुव्हमेंट) हिचाही समावेश आहे. ही संघटना शिंजियांग प्रांताला स्वतंत्र करण्यासाठी लढत आहेत.