‘फायझर’ आणि ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ यांच्या लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर १० आठवड्यांत ५० टक्के न्यून होतो प्रभाव ! – ‘युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन’चा निष्कर्ष

लंडन (ब्रिटन) – ‘युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन’ने कोरोना लसीच्या संदर्भात केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, ‘फायझर’ आणि ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ (कोव्हिशिल्ड) यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे २ डोस घेतल्यानंतर प्रतिपिंडाचे (‘अँटीबॉडीज’चे) प्रमाण अधिक रहाते. त्यामुळे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी या लसींच्या २ मात्रा घेणे आवश्यक आहे; मात्र या लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही २-३ मासांमध्ये प्रतिपिंड न्यून होतात. १८ वर्षांवरील ६०० जणांचा अभ्यास केल्यावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यात व्यक्तींचे वय, त्यांना असणारे इतर रोग यांचा विचार करण्यात आला नव्हता.

१. ‘लॅन्सेट’ या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या या वृत्तात म्हटले आहे की, फायझर आणि अ‍ॅस्ट्राझेनेका या लसींनी सिद्ध झालेले ‘कोरोना विषाणूविरोधी प्रतिपिंड’ ६ आठवड्यांत न्यून होण्यास प्रारंभ होतो अन् १० व्या आठवड्यापर्यंत ते ५० टक्क्यांच्या खाली जातात.

२. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनने म्हटले आहे की, जर प्रतिपिंडे या वेगाने न्यून होत असतील, तर या लसींमुळे मिळणारे संरक्षण अल्प होत जाणार आहे. त्यातच विषाणूचे नवीन प्रकार समोर येत आहेत.