‘८.४.२०२१ या दिवशी माझ्या वडिलांची कोरोनाची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ (सकारात्मक) आली आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार ते घरीच उपचार घेत होते; परंतु दोन दिवसांनी ‘वडिलांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी न्यून झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागेल’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले. त्यापूर्वी दोन दिवस माझ्या यजमानांनाही ‘कोरोना’ची लक्षणे दिसू लागली. या कालावधीत देवाने मला स्थिर ठेवून भावाच्या स्तरावर माझ्याकडून करवून घेतलेले प्रयत्न भगवंताच्या चरणी अर्पण करते. माझ्याकडून झालेले प्रयत्न येथे देत आहे.
१. वडिलांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी न्यून होणे, त्याच वेळी यजमानांना कोरोना होणे आणि अशा स्थितीत ‘प.पू. गुरुमाऊली आहेत अन् तेच काळजी घेणार आहेत’, असा विचार करून शांत रहाता येणे
१०.४.२०२१ या दिवशी माझ्या वडिलांच्या (श्री. चंद्रकांत शिंदे, वय ७२ वर्षे यांच्या) रक्तातील ऑक्सिजनची पातळी न्यून होऊन त्यांना त्रास होऊ लागला. त्याच वेळी माझ्या यजमानांनाही कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने मला वडिलांच्या साहाय्याला जाता येत नव्हते. माझी वहिनी वडिलांना रुग्णालयात घेऊन गेली; परंतु ४ – ५ रुग्णालयांनी विविध कारणे देऊन त्यांना भरती करून घेतले नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा घरी आणले. या सगळ्या परिस्थितीतही ‘प.पू. गुरुमाऊली आहेत आणि तेच काळजी घेणार आहेत’, असा विचार करून मला शांत रहाता आले. त्या वेळी माझ्याकडून ‘नामजप आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे’, असे प्रयत्न होऊ लागले. त्यानंतर गुरुकृपेने रात्री उशिरा त्यांना एका रुग्णालयात पलंग (बेड) उपलब्ध झाला.
२. सर्वत्र रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असतांना गुरुकृपेने आवश्यक तेवढे इंजेक्शन उपलब्ध होणे
वडिलांना रुग्णालयात भरती केल्यानंतर आधुनिक वैद्यांनी रेमडेसिविर इंजेक्शन, तसेच प्लाझ्मा (रक्तातील पिवळसर द्रव) यांची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्या वेळी सर्वत्र रेमडेसिविरचा तुटवडा असतांना केवळ गुरुदेवांच्या कृपेने आवश्यक तेवढे रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाले, तसेच प्लाझ्माही त्वरित मिळाला.
३. ‘वडिलांच्या पलंगासमोर परात्पर गुरु डॉ. आठवले उभे आहेत आणि त्यांच्याकडून वडिलांकडे पिवळा अन् पांढरा प्रकाश जात आहे’, असे दृश्य सूक्ष्मातून दिसणे आणि त्यानंतर वडिलांची प्रकृती सुधारू लागणे
१२.४.२०२१ च्या रात्री अकस्मात् वडिलांना अतीदक्षता विभागात हालवल्याचे मला कळले. त्या वेळी माझा नामजप आणि प्रार्थना होत होती. एक दिवस मी नामजप करत असतांना ‘रुग्णालयात बाबांच्या पलंगासमोर परात्पर गुरु डॉ. आठवले उभे आहेत आणि त्यांच्याकडून बाबांकडे पिवळा अन् पांढरा प्रकाश जात आहे’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले. त्यानंतर बाबांना दोन दिवस अतीदक्षता विभागात ठेवल्यावर सर्वसामान्य कक्षात आणले. नंतर त्यांची शारीरिक स्थिती सुधारू लागली. आधुनिक वैद्यांनी ‘त्यांना दोन दिवसांनी घरी सोडू’, असे सांगितले.
४. यजमानांना कोरोना झाल्याच्या कालावधीत घरचे सर्वकाही गुरूंनीच करवून घेणे आणि यजमानांची सेवा करतांना मुलाला अन् स्वतःला कुठलाही त्रास न होणे
यजमानांची ‘कोराना’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ (सकारात्मक) आल्यानंतर घरातील सर्वकाही गुरुदेवच माझ्याकडून करवून घेत होते. माझे घर दोन खोल्यांचे असल्याने घरातील आमचा वावर मर्यादित होता. त्या स्थितीत ‘स्वच्छता करणे, निर्जंतुकीकरण करणे, शुद्धी करणे, आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे, यजमानांची औषधे आणि आहार यांच्या वेळा सांभाळणे’, हे सर्वकाही प.पू. गुरुदेवांनीच माझ्याकडून करवून घेतले.
माझ्या मुलाने (कु. शरण (वय १० वर्षे) याने) आलेली परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार प्रयत्न केले. त्याला समजावून सांगितल्यावर तो अन्यत्र न जाता स्वयंपाकघरातच बसू लागला. ११ ते ३० एप्रिल २०२१ या संपूर्ण कालावधीत ‘घरात दिवसभर मुखपट्टी (मास्क) लावणे, बाबांच्या जवळ न जाणे, त्यांना नामजपाची आठवण करून देणे, स्वतः नामजप करणे, वार्षिक परीक्षा असल्याने वेळच्या वेळी अभ्यास करणे, घरात स्वतःहून मला साहाय्य करणे’, हे सर्व त्याने केले. घरात दोन खोल्या असूनही मला आणि शरणला काहीही त्रास झाला नाही.
५. यजमानांना कोरोनाची लागण झालेली असतांना ते काम करत असलेले दुकान बंद राहिल्याने त्यांच्या वेतनावर परिणाम न होणे
आमची आर्थिक परिस्थिती बेताची असतांना दळणवळण बंदी लागू झाल्यावर यजमानांना कोरोनाची लागण झाली. यजमान विक्रेता (सेल्समन) म्हणून ‘पी.एन्. गाडगीळ’ या आस्थापनामध्ये कामाला आहेत. त्यांना तेथे अन्य आस्थापनांप्रमाणे वैद्यकीय सुट्या नसतात. त्यामुळे रजा झाली की, वेतनात कपात होते.; परंतु वर्ष २०२० मध्ये दळणवळण बंदी असल्याने अनायासे दुकानच बंद राहिल्याने त्यांच्या सुट्या झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या वेतनावरही परिणाम झाला नाही. ही देवाची आमच्यावरील कृपाच होती.
६. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील चैतन्यामुळे घरातील वातावरण पुष्कळ हलके होणे आणि विविध सत्संगांमुळे मन आणखी स्थिर होणे
या संपूर्ण कालावधीत देवाने मला अखंड अनुसंधानात ठेवले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ, म्हणजे आधार, शक्ती आणि आशीर्वाद आहे. या ग्रंथातील चैतन्यामुळे आमच्या घरातील वातावरण पुष्कळ हलके झाले होते. ‘प्रत्येक गुरुवारचा भाववृद्धी सत्संग, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये पहाटे घेत असलेला कोरोना कालावधीत आध्यात्मिक बळ वाढण्यासाठी करायचा नामजप, जिल्ह्यातील गुरुलीला सत्संग’ यांमुळे माझे मन आणखी स्थिर झाले. त्या काळात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले २४ घंटे माझ्या समवेत आहेत’, असे जाणवून माझ्याकडून केवळ कृतज्ञता व्यक्त होत होती.
७. साधिकांनी वेळोवेळी साहाय्य केल्याने त्यांचा आधार वाटणे
या कालावधीत सौ. मनीषा पाठक, सौ. नीता पाटील, सौ. प्रतिभा फलफले इत्यादी साधिकांनी मला ‘दूरभाष करून वेळोवेळी माझी विचारपूस करणे, मला हवं-नको ते पहाणे आणि नामजपादी उपायांचा आढावा घेणे’, हे साहाय्य केले. त्यामुळे मला त्यांचा पुष्कळ आधार वाटत होता आणि काळजी वाटली नाही. माझ्या मनात विचार आले, तरी ‘परात्पर गुरु डॉक्टर आहेत’, हेच मन स्वीकारत होते.
८. ‘मनमोकळेपणाचा अभाव’ या स्वभावदोषावर पुष्कळ प्रयत्न करूनही पालट न होणे आणि कोरोनाच्या काळात देवानेच कृतीच्या स्तरावर प्रयत्न करवून घेतल्याने मन हलके रहाणे
‘मनमोकळेपणाचा अभाव’ या स्वभावदोषावर मी पुष्कळ प्रयत्न करूनही माझ्यात अपेक्षित पालट होत नव्हता; परंतु या काळात ‘साधक आणि नातेवाईक यांच्याशी बोलणे अन् त्यांचे साहाय्य घेणे’, असे प्रयत्न देवानेच माझ्याकडून कृतीच्या स्तरावर करवून घेतले आणि माझे मन हलके ठेवले. अनपेक्षितपणे आलेल्या या काळात केवळ आणि केवळ गुरुकृपेने मला यातून बाहेर पडता आले.
गुरुदेव, हीच प्रार्थना तुम्हा ।
मज नाही येत कृतज्ञता ।
शब्दांच्या पलीकडची आपली लीला ।।
गुरुदेव, मज घडवा ।
हीच प्रार्थना तुम्हा ।। १ ।।
तुमचे चरण माझ्या हृदयी असू दे सदासर्वदा ।
भावभक्तीची ओंजळ असू दे भरलेली सदा ।।
कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता ।। २ ।।
– सौ. नम्रता अतुल कोळसकर, सातारा रस्ता, पुणे. (२७.४.२०२१)
|