अफगाणिस्तानमधील शीख आणि हिंदू यांना नागरिकत्व देण्यासाठी कॅनडा सरकारने योजना आखावी ! – कॅनडातील शिखांच्या संघटनांची मागणी

  • भारताने आधीच अशांना नागरिकत्व देण्याची घोषणा केली असतांना आणि भारत या नागरिकांसाठी जवळचा देश असतांना स्वतःचे महत्त्व निर्माण करण्यासाठीच या शीख संघटना अशी मागणी करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !
  • कॅनडातील शीख संघटना खलिस्तानवाद्यांच्या समर्थक असून त्यांनी यापूर्वी भारतातील नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला होता, हे लक्षात घ्या !

ओटावा (कॅनडा) – कॅनडातील शिखांच्या संघटनांनी कॅनडा सरकारला अफगाणिस्तानमधील शीख आणि हिंदू यांना नागरिकत्व देण्यासाठी एक विशेष योजना आखण्याची मागणी केली आहे. ‘मनमीत सिंह भुल्लर फाऊंडेशन’, ‘खालसा अँड कॅनडा’ आणि ‘जागतिक शीख संघटना’ यांनी संयुक्तरित्या याविषयी मागणी केली आहे. भारत सरकारने यापूर्वीच अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथून मुसलमानव्यतिरिक्त येणार्‍या शरणार्थींना नागरिकत्व देण्याचे घोषित केलेले आहे.

या संघटनांनी म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये प्रतिदिन स्थिती बिघडत असल्याने तेथील अल्पसंख्यांक शीख आणि हिंदू यांच्यावर आक्रमणे होऊ शकतात. त्यामुळे  सरकारने अफगाणिस्तान सरकारकडे त्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करण्यास सांगावे. मार्च २०२० मध्ये काबुलमध्ये गुरुद्वारा ‘श्री गुरु हर राय साहिब’वर आक्रमण केल्यानंतर अनेक शीख आणि हिंदू भारतात निघून गेले होते. आताही अशीच स्थिती निर्माण होऊ शकत असल्याने त्यांना तात्काळ संरक्षण देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.