१. ‘कोरोना महामारीमुळे या वर्षी गुरुपौर्णिमा कशी साजरी होणार ?’, याची मनाला रुखरुख लागणे आणि दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेली ‘साधकांनी आपापल्या घरी राहूनच गुरूंच्या प्रतिमेचे पूजन करून गुरुपौर्णिमा साजरी करा !’, ही चौकट वाचून आनंद जाणवणे
‘५.७.२०२० या दिवशी गुरुपौर्णिमा होती. ‘कोरोना महामारीमुळे लागू झालेली दळणवळण बंदी आणि सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) ठेवणे’, यांमुळे ‘यावर्षी गुरुपौर्णिमा कशी साजरी होणार ?’, याची माझ्या मनाला रुखरुख लागली होती. त्यानंतर लगेचच दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सध्या आपत्काळ असल्यामुळे साधकांनी आपापल्या घरी राहूनच गुरूंच्या प्रतिमेचे पूजन करून गुरुपौर्णिमा साजरी करा !’, ही चौकट प्रसिद्ध झाली. ती चौकट वाचून ‘ईश्वरच सगळे व्यवस्थित करून घेणार आहे’, असे वाटून मला आनंद जाणवू लागला.
२. ‘आज प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले घरी येणार’, या भावाने सर्व कृती भराभर अन् आनंदाने होऊन नामजपही आपोआप होणे आणि पूजा केल्यानंतर आनंद अन् चैतन्य यांत वाढ होऊन भावजागृती होणे
४.७.२०२० या दिवशी, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी ‘प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले घरी येणार आहेत’, या जाणिवेनेच मला पुष्कळ आनंद वाटत होता. ५.७.२०२० या दिवशी, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी जाग आल्यानंतर मला पुष्कळ उत्साही वाटत होते. एरव्ही सकाळी लवकर उठल्यावर मला थकवा जाणवतो; पण त्या दिवशी तसे काही जाणवत नव्हते. ‘आज गुरुदेव घरी येणार आहेत’, या भावाने माझ्याकडून सर्व कृती भराभर आणि आनंदाने होत होत्या. माझा नामजपही आपोआप होत होता. पूजा केल्यानंतर आनंद आणि चैतन्य यांत वाढ होऊन माझी भावजागृती झाली. त्या वेळी मला ‘परात्पर गुरुदेव कृपाळू दृष्टीने आशीर्वाद देत आहेत’, असे जाणवत होते.
३. मला संपूर्ण घरात चैतन्य जाणवत होते. गुरुदेवांनी आतापर्यंत जे जे दिले, त्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.
४. घरातील सर्व सदस्य आनंदी होते. घरात येणारे सर्व जण ‘आज तुमच्याकडे पुष्कळ चांगले वाटत आहे. जणूकाही सत्यनारायणाची पूजा असल्यासारखेच वाटत आहे’, असे म्हणत होते.
५. गुरूंनीच त्यांच्या अस्तित्वाची प्रचीती देऊन मला कृतकृत्य केले. त्या वेळी नकळत माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘गुरुदेव, आज गुरुपौर्णिमेला तुम्ही दिलेले चैतन्य मला पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत टिकवून ठेवता येऊ दे.’
– श्रीमती ज्योती आनंद चौधरी, वालावल, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (वर्ष २०२०)
आध्यात्मिक पातळी न्यून झाल्यावर साधिकेचे साधनेविषयी झालेले चिंतन आणि मुलींच्या माध्यमातून साधनेत साहाय्य करून गुरुदेवांनी तिच्यावर केलेली कृपा !
१. आध्यात्मिक पातळी १ टक्क्याने न्यून झाल्याचे समजल्यावर खंत वाटणे आणि मायेत गुरफटल्याची जाणीव होऊन मन अस्वस्थ होणे
‘वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेनंतर तिसर्या दिवशी मला माझी मुलगी कु. गीता हिच्याकडून ‘माझी आध्यात्मिक पातळी
१ टक्क्याने न्यून झाली आहे’, असे समजले. (वर्ष २०१९ मध्ये ६२ टक्के आध्यात्मिक पातळी होती. ती वर्ष २०२० मध्ये ६१ टक्के एवढी झाली होती. आता वर्ष २०२१ मध्ये पातळी ६० टक्के एवढी आहे. – संकलक) त्या वेळी मला खंत वाटलीच; पण ‘गुरुदेवांना अपेक्षित असे व्यष्टी साधनेचे प्रयत्न, म्हणजेच नामजप, प्रार्थना, कृतज्ञता, भावजागृतीचे प्रयत्न, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न माझ्याकडून झाले नाहीत’, याची जाणीवही झाली. मी मायेत पूर्णपणे गुरफटले होते. माझ्याकडून देवाला आर्ततेने हाक मारणे होत नव्हते. त्या वेळी ‘आता साधनेचे प्रयत्न कसे करू ? काय करू ?’, या विचारांमुळे मी अस्वस्थ झाले होते.
२. मुलींनी ‘साधनेत कुठे न्यून पडते ?’, याची जाणीव करून देऊन साधनेत साहाय्य करणे आणि त्यानंतर साधनेची घडी बसल्यामुळे एक वेगळा आनंद मिळू लागणे
माझे वय ७० वर्षे असल्यामुळे मी समष्टी सेवा करू शकत नाही; परंतु गीताने समष्टी आणि व्यष्टी नामजप, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन, ‘स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न, चुकांचे लिखाण अन् त्या संदर्भातील स्वयंसूचना’ यांचे महत्त्व सांगून मला त्यांचे नियोजन करून दिले. १० दिवस मी माझी मुलगी सौ. मुक्ती तांबे हिच्याकडे रहायला गेले होते. तेथे गेल्यावर ‘मी कुठे आणि कशी न्यून पडते ?’, याची मुलींनी (कु. गीता आणि सौ. मुक्ती तांबे यांनी) जाणीव करून देऊन मला साधनेत साहाय्य केले. त्यामुळे ‘मी प्रयत्नांत न्यून पडते’, याची मला जाणीव झाली. मुलींमुळेच माझ्याकडून गांभीर्याने प्रयत्न होऊन माझ्या साधनेची घडी बसली. व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमुळे मला एक वेगळा आनंद मिळू लागला आहे. तो गुरूंनी मिळवून दिला; म्हणून त्यांच्याविषयी आणि दोन्ही मुलींविषयी मला कृतज्ञता वाटू लागली.
‘गुरुमाऊली, ‘हे सर्व तुम्हीच मला अनुभवायला देऊन माझ्याकडून लिहून घेतले’, यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. तुम्हीच या जिवाची काळजी घेऊन मला घडवत आहात. ‘या दहा दिवसांत मुलीकडे असतांना केलेले साधनेचे प्रयत्न मला घरीही चिकाटीने करता येऊ देत’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना करते.’
– श्रीमती ज्योती आनंद चौधरी, वालावल, जिल्हा सिंधुदुर्ग. (वर्ष २०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |