जे साधना म्हणून लेखन करतात, त्यांच्याकडूनच गुरु लिखाणाचे कार्य करून घेतात ! – वैज्ञानिक आणि लेखक डॉ. मोहन बांडे

  • इंदूर (मध्यप्रदेश) येथील भक्तवात्सल्याश्रमातील प.पू. भक्तराज महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव !

  • ‘नाथ माझा भक्तराज’ ग्रंथाच्या चतुर्थ आवृत्तीचे, तर डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी लिहिलेल्या ‘अमृतमय गुरुगाथा’ ग्रंथाच्या १ ते ४ खंडांचे प्रकाशन !

ग्रंथ प्रकाशन करतांना डावीकडून डॉ. (सौ.) कुंदा आठवले, श्री. अनिल जोग, डॉ. मोहन बांडे, श्री. शरद बापट आणि श्री शशिकांत ठुसे

मुंबई – प्रत्येक साधकाच्या जीवनात गुरु वेगवेगळ्या माध्यमातून येत असतात. सगळे संत वेगवेगळे दिसत असले, तरी ते आतून एकच असतात. कुणाकडून कोणती साधना करवून घ्यायची हे त्यांना ठाऊक असते. त्यामुळे ‘काय करून घेतले की, साधकाची साधना होईल’, हे गुरूंना ठाऊक असल्याने ते त्याच्याकडून तसे कार्य करून घेतात. लेखन ही एक साधना आहे. जो साधक साधना म्हणून लेखन करणार आहे, त्याच्याकडून ती करून घेणार आहे. माझ्याकडून माझ्या गुरूंनी ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘अमृतानुभव’ यांचे हिंदी अनुवाद करून घेतला. समर्थांचे चरित्र हिंदीतून लिहून घेतले. ‘दासबोध’, ‘मनाचे श्लोक’ यांवर लिखाण करून घेतले.

प.पू. गुळवणी महाराज यांचे चरित्र हिंदी भाषेतून लिहून घेतले, असे भावपूर्ण प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक आणि वैज्ञानिक डॉ. मोहन बांडे यांनी केले. सनातन संस्थेचे श्रद्धास्थान आणि सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूर येथील भक्तवात्सल्याश्रमामध्ये २२ आणि २३ जुलै या दिवशी कोरोनाचे सर्व नियम पाळून गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. २२ जुलैला डॉ. बांडे यांच्या हस्ते उज्जैन येथील श्री. विठ्ठल पागे यांनी लिहिलेल्या ‘नाथ माझा भक्तराज’ या ग्रंथाच्या चतुर्थ आवृत्तीचे, तसेच डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी, तसेच प.पू. रामानंद महाराज यांच्याविषयी लिहिलेल्या  ग्रंथांच्या १ ते ४  खंडांचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं परमार्थिक सेवा ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. शरद बापट, उपाध्यक्ष श्री. अनिल जोग, प.पू. बाबांचे भक्त श्री. शशिकांत ठुसे आणि डॉ. (सौ.) कुंदा आठवले, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे ‘ऑनलाईन’ प्रक्षेपण करण्यात आले.

संतांची चरित्रे ही त्यांची ‘वाङ्मय मूर्ती’ असते !

डॉ. बांडे पुढे म्हणाले की, माझा अध्यात्माशी काही संबंध नव्हता. माझ्या गुरूंनी मला त्यांच्या जवळ आणले आणि माझ्याकडून लेखन साधना करवून घेतली. मी कधी जप, तीर्थयात्रा आणि ध्यान केले नाही. गुरूंच्या कृपेने माझ्याकडून त्यांनी ग्रंथांचे लिखाण करवून घेतले. आज येथे प्रकाशित करण्यात आलेल्या ग्रंथांच्या लेखकांचे मी अभिनंदन करू शकत नाही; कारण त्यांनाही ठाऊक आहे की, हे ग्रंथ त्यांनी लिहिलेले नाहीत, तर त्यांच्याकडून त्यांच्या गुरूंनी ते लिहून घेतले आहेत. संतांची चरित्रे ही त्यांची ‘वाङ्मय मूर्ती’ असते, असा भाव ठेवून त्याचे वाचन केले पाहिजे. त्यातून पुढे आत्मज्ञानाकडे जाता येते.

ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर प.पू. भक्तराज महाराज यांच्या वर्ष १९९५ मध्ये ८ आणि ९ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ध्वनीचित्रफितीचे प्रसारण करण्यात आले. रात्री ९.३० वाजता पारंपरिक भजनाने २२ जुलैच्या कार्यक्रमाची सांगता झाली.

डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी लिहिलेल्या आणि प्रकाशित करण्यात आलेल्या ग्रंथांची नावे

१. अमृतमय गुरुगाथा : खंड १

डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्या आध्यात्मिक जीवनाचा आरंभ आणि त्यांना झालेली गुरुप्राप्ती (गुरु प.पू. भक्तराज महाराजांच्या अमृत महोत्सव सोहळ्यासह)

२. अमृतमय गुरुगाथा : खंड २

गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या अगम्य लीला आणि शिकवण (गुरूंच्या सान्निध्यातील अविस्मरणीय प्रसंगांसह )

३. अमृतमय गुरुगाथा : खंड ३

गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या अखेरच्या आजारपणात घडलेली त्यांची सेवा (गुरुसेवेतील अनुभूती आणि गुरूंचे महानिर्वाण यांसह)

४. अमृतमय गुरुगाथा : खंड ४

प.पू. रामानंद महाराजांच्या सान्निध्यातील अनुभव आणि त्यांच्याविषयीच्या अनुभूती (आश्रमजीवन, गुरुपौर्णिमा, प्रवास आदींच्या संदर्भातील अनुभव)

गुरूंच्या चरित्राच्या चतुर्थ आवृत्तीला माझ्या ग्रंथांचे प्रकाशन होणे हा माझ्या जीवनातील परमभाग्याचा दिवस ! – डॉ. (सौ.) कुंदा आठवले

आज माझ्या गुरूंच्या चरित्र ग्रंथाच्या चतुर्थ आवृत्तीचे प्रकाशन होत असतांना माझ्या ग्रंथांचे प्रकाशन होणे, हा माझ्या जीवनातील परमभाग्याचा दिवस आहे. आम्ही अनुभवलेले प.पू. भक्तराज यांच्याविषयीचे दिवस हा इतिहास आहे आणि तो पुढच्या पिढीला ‘गुरु काय असतात, त्यांचे जीवन कसे असते’, हे कळले पाहिजे. यासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी मला तो लिहिण्यास सांगितल्यावर मी हे ग्रंथ लिहिले आहेत.

भावपूर्ण वातावरणात झाले श्री व्यासपूजन !

२३ जुलै या दिवशी सकाळी ८ वाजता भावपूर्ण वातावरणात श्री सत्यनारायण पूजन आणि श्री व्यासपूजन करण्यात आले. त्यानंतर स्तवन मंजिरी आणि रामानंद बावनी पाठ झाल्यानंतर श्रींच्या पादुकांवर अभिषेक, पूजन आणि आरती करण्यात आली.