जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने आतंकवाद्यांचे ड्रोन पाडले ५ किलो स्फोटके जप्त !

पाक आतंकवाद्यांच्या साहाय्याने भारतावर आक्रमणे करण्यासाठी नवनवीन माध्यमे शोधत आहे. त्यामुळे भारताने पाकचे कितीही ड्रोन पाडले, तरी तो अन्य मार्गांनी भारतावर आक्रमणे करतच रहाणार आहे. त्यामुळे पाकलाच नष्ट करणे, हाच जम्मू-काश्मीरसह भारत आतंकवादमुक्त करण्याचा एकमेव मार्ग आहे, हे सरकारने आता तरी जाणावे !

जम्मू काश्मीर पोलीस ड्रोन समावेत

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सीमेच्या ८ कि.मी. आतमध्ये घुसलेले आतंकवाद्यांचे ड्रोन भारतीय सैन्याने २३ जुलै या दिवशी पाडले. या ड्रोनमधून ५ किलो स्फोटके जप्त करण्यात आली.

जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेकडून अखनूरजवळ ड्रोनच्या साहाय्याने आक्रमण करण्यात येणार असल्याची माहिती सैन्याला मिळाल्यावर सैन्याने व्यूहरचना आखली. त्यानुसार मध्यरात्री १ वाजता हे ड्रोन पाडण्यात आले.

अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह म्हणाले, ‘‘हे ड्रोन ६ फूट लांब होते आणि त्याचे वजन १७ किलो होते. हे ड्रोन चीनमध्ये, तर त्याचे सुटेभाग (स्पेअरपार्ट्स) तायवानमध्ये बनवण्यात आले आहेत. मागील दीड वर्षांत ड्रोनद्वारे वाहून नेण्यात आलेले १६ एके-४७ रायफल, ३ एम्-४ रायफल, ३४ बंदुका, १५ ग्रेनेड आणि १८ आयईडी हस्तगत करण्यात आले आहेत. काही ड्रोन्सद्वारे पैसेही पाठवण्यात आले होते. आतापर्यंत जवळपास ४ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. जैश-ए-महंमद आणि लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटना ड्रोनच्या साहाय्याने काश्मीरमध्ये आक्रमण करण्याचा कट रचत आहेत.’’