समजूतदार, कठीण प्रसंगातही स्थिर रहाणारी आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याप्रती भाव असलेली परभणी येथील कु. साक्षी रुद्रकंठवार (वय १८ वर्षे) !

१. समजूतदारपणा

‘कु. साक्षी लहानपणापासूनच पुष्कळ गुणी आहे. तिच्यात पुष्कळ समजूतदारपणा आहे. तिचा तोंडवळा सुंदर आहे. तिला पाहिल्यावर ‘ती दैवी बालिका असेल’, असे वाटते.

सद्गुरु श्री. राजेंद्र शिंदे

२. महाविद्यालयीन शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यावर साक्षीची अंतर्मनातून साधना होऊ लागणे 

साक्षीची आई तिला साधना करण्याविषयी समजावून सांगायची; पण आईने बळजोरी केल्यावरच साक्षी नामजप करायची. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तिला उमरखेड  (जिल्हा यवतमाळ) येथे जावे लागले. ‘तेथे गेल्यावर तिची अंतर्मनातून साधना चालू झाली’, असे मला जाणवले. घरापासून दूर राहिल्याने तिला अनेक वस्तूंचे, पैसा आणि वेळ यांचे मूल्य लक्षात आले. नातेवाइकांच्या मनाच्या स्थितीचा अभ्यास करून ती त्यांना प्रेमाने दत्ताचा नामजप करण्यास सांगू लागली.

कु. साक्षी रुद्रकंठवार

३. समजूतदारपणा वाढल्याने घरकामांत आईला साहाय्य करणे

पूर्वी घरी असतांना साक्षी कधीच घरकामांत साहाय्य करत नव्हती. तिचे मनाप्रमाणे वागणे आणि खाणे-पिणे असायचे. नंतर २ वर्षे बाहेरगावी राहिल्याने तिच्यात बराच समजूतदारपणा आला. सुट्टीच्या निमित्ताने घरी आल्यावर ‘आई किती काम करते ?’, याची जाणीव तिला होऊ लागली आणि आपोआपच घरातील सर्वांना ती साहाय्य करू लागली.

४. ‘प.पू. गुरुदेव आपल्याला घडवत आहेत’, या भावामुळे कठीण प्रसंगांना आनंदाने सामोरे जाणे

ती तिच्या नातेवाईकांच्या घरी रहात असतांना घरात वादाचे प्रसंग घडायचे. ‘अशा प्रसंगात कसे प्रयत्न करायचे ?’, हे तिच्या लगेच लक्षात यायचे. येणार्‍या अडचणींना ती आनंदाने सामोरे जायची. तिच्यात सर्वच प्रकारे गांभीर्य निर्माण झाले. ती स्वतःची सर्व कामे स्वतः करायची. तिला तिचे कपडे रात्री धुवावे लागायचे. लहानपणी लाडात वाढलेल्या साक्षीला असे प्रसंग त्रासदायक ठरले असते; पण तिच्या मनात एकच विचार असायचा, ‘प.पू. गुरुदेव आपल्याला घडवत आहेत.’ तिच्या अपार श्रद्धेमुळेच ती कठीण प्रसंगाला आनंदाने आणि सहजतेने सामोरे जाण्यास शिकली.

५. संतांप्रती भाव

५ अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना पाहिल्यानंतर भावजागृती होणे : साक्षी वर्ष २०१५ च्या सुटीत देवद आश्रमात आली होती. त्या वेळी तिने प्रथमच सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना पाहिले आणि तिची पुष्कळ भावजागृती झाली.

५ आ. आम्हाला रामनाथी आश्रमात जाण्यास मिळाले. तेथे संतांची भेट झाल्यावर साक्षी माझ्या बहिणीला म्हणाली, ‘‘आई, मला सर्वकाही मिळाले !’’

५ इ. सद्गुरु राजेंद्रदादांवर सुंदर कविता करणे : वर्ष २०१७ मध्ये साक्षी पुन्हा देवद आश्रमात आली. त्या काळात तिने सद्गुरु राजेंद्रदादांवर सुंदर कविता केली होती आणि एक चित्र काढून त्यांना भेट दिले होते. तिच्यात अनेक कला आहेत. तिने कोणतेही शिकवणीवर्ग लावलेले नाहीत, तरी ती मेंदी आणि चित्रे सुबक रित्या काढते.

सौ. अंजली झरकर

५ ई. सद्गुरु राजेंद्रदादांना भेटण्याची तळमळ असणे आणि त्यांच्या भेटीने आनंदी होणे : वर्ष २०१९ मध्ये साक्षीत आणखी पालट झाल्याचे जाणवले. ती देवद आश्रमात आल्यावर सद्गुरु राजेंद्रदादांना भेटली नव्हती. त्यामुळे दुपारपर्यंत तिची अवस्था ‘कधी एकदा सद्गुरु दादांना भेटते’, अशी झाली होती. सद्गुरु दादा दुरून जरी दिसले, तरी तिच्या तोंडवळ्यावरचा आनंद वाढायचा. त्या दोघांना एकत्र पाहिल्यावर ‘त्यांच्यात एक वेगळेच नाते आहे’, असे मला जाणवायचे.

आश्रमात आल्यावर साक्षी पूर्णपणे आश्रमाची होऊन जाते. तिला पूर्णवेळ साधिका होण्याची पुष्कळ इच्छा आहे. सद्गुरु दादाही तिचे नेहमी कौतुक करतात. ते म्हणतात, ‘‘एक वेळ येईल आणि ती साधनेत पुढे जाईल !’’

पूर्वीची साक्षी आणि आताची साक्षी यांमध्ये पुष्कळ पालट झाले आहेत. मला ते शब्दांत मांडता येत नाहीत. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या प्रेरणेमुळे मी साक्षीविषयी लिहू शकले. त्यासाठी कृतज्ञता !’

– सौ. अंजली झरकर (कु. साक्षीची मावशी), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.९.२०१९)