पहा Videos : चीनमध्ये गेल्या १ सहस्र वर्षांत सर्वाधिक पाऊस : लक्षावधी लोक बेघर !

  • २५ लोक मृत्यूमुखी

  • २ धरणे नष्ट

चीन ब्रह्मपुत्रा, तसेच अन्य नद्यांवर अवैधरित्या मोठमोठी धरणे बांधून त्यांचे पाणी अडवतो. याचा फटका भारतासह आजूबाजूच्या देशांना बसतो. ‘अशी अनैसर्गिक कृती करून इतर देशांना त्रास देणार्‍या चीनला आता निसर्गच धडा शिकवत आहे’, असे कुणी म्हटल्यास ते चुकीचे ठरू नये !

बीजिंग – येथील हेनान प्रांतात गेल्या १ सहस्र वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद चिनी हवामान विभागाने नोंदवली आहे. ‘टेलीग्राफ’ या विदेशी वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २५ लोक मृत्यूमुखी पडले असून लक्षावधी लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ‘भयावह पुरामुळे बचावकार्यात पुष्कळ अडथळे निर्माण होत आहेत’, असे म्हटले आहे.

१. हेनान प्रांताची राजधानी असलेल्या चाँगचोऊ शहरात पावसाची वार्षिक सरासरी ६४०.८ मिलीमीटर असतांना १७ जुलै ते २१ जुलै या ५ दिवसांतच तब्बल ६१७.१ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

२. चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पाऊस पडत असून बहुतेक नद्यांची पातळी धोकादायक स्तरापर्यंत पोचली आहे. उत्तर चीनमधील किमान २ धरणे फुटली आहेत. अन्यही अनेक धरणे नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त आहे. ‘चाँगचोऊ शहरापासून जवळ असलेले ‘इहेतान’ नावाचे धरण केव्हाही फुटू शकते’, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

३. चीन हा पाण्याच्या साठ्यासाठी धरणांवर पुष्कळ प्रमाणात अवलंबून असून देशात एकूण ९८ सहस्र धरणे आहेत. त्यांतील बहुतेक धरणे काही दशकांपूर्वी बनवण्यात आली असून पावसाचे पाणी रोखू शकण्याच्या त्यांच्या क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

४. चाँगचोऊ येथील पुरामुळे माजलेल्या हाहा:काराचे व्हिडिओज आणि छायाचित्रे जगभरात सामाजिक माध्यमांवरून ‘व्हायरल’ (मोठ्या प्रमाणात प्रसारित) झाले असून त्याविषयी जागतिक समुदायाकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. या व्हिडिओजमध्ये लोक वाहून जात असल्याचे दिसत आहे. शेकडो चारचाकी गाड्यांचीही तशीच स्थिती पहायला मिळत आहे. अनेक रेल्वेगाड्यांमध्ये छातीएवढे पाणी घुसले असून चिनी नागरिक तेथून हलू शकत नसल्याचे व्हिडिओजमधून समोर आले आहे.