मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील फरार आरोपीने निवडणूक लढवली, ती जिंकली आणि गावचा सरपंचही बनला !

पोलिसांना मात्र पत्ताच नाही !

  • पोलिसांच्या कारभाराचे धिंडवडे काढणारी घटना ! फरार गावगुंड निवडणूक लढवून सरपंच होईपर्यंत त्याचा थांगपत्ता न लागणार्‍या पोलिसांना कधी घुसखोरी करणारे नक्षलवादी आणि आतंकवादी यांच्याविषयी माहिती मिळू शकेल का ? असे पोलीस जनतेचे कधी रक्षण करू शकतील का ? हे चित्र पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • यास उत्तरदायी असलेल्या पोलिसांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
  • आपण ज्याला निवडून देत आहोत, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी पडताळण्याची तसदीही जनता घेत नाही. यावरून जनतेचा निद्रिस्तपणा दिसून येतो. अशांनाच नंतर हे गुन्हेगार त्रास देतात, त्यात आश्‍चर्य ते काय ?
कुख्यात गुंड संजय सिंह

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – फरार असलेल्या एक कुख्यात गुंडाने ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली, ती जिंकली आणि चक्क गावाचा सरपंचही झाला. तरीही पोलिसांना याचा सुगावा न लागल्याची घटना उत्तरप्रदेशमधील मुरादाबाद येथे घडली.

संजय सिंह असे या कुख्यात गुंडाचे नाव असून पोलिसांनी त्याला ५० लाख रुपये किमतीच्या ३० सहस्र लिटर बनावट दारूसह अटक केली होती. या प्रकरणी त्याला मे मासात जामीन मिळाला होता; मात्र अन्य प्रकरणातील चौकशीसाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. तेव्हा पोलिसांना तो सापडत नव्हता. फरार असलेल्या सिंह याच्याविरुद्ध पोलिसांनी ‘गँगस्टर’ कायद्यानुसार गुन्हा नोंदवला, तसेत त्याच्यावर २० सहस्र रुपयांचे बक्षीसही घोषित केले.

या कालावधीत मुरादाबादमधील निवाड गावात ग्रामपंचायतीची निवडणूक घोषित झाली. संजय सिंह यानेही निवडणुकीसाठी अर्ज भरला. तो निवडणूक लढला आणि निवडून आला. इतकेच नव्हे, तर यानंतर त्याने गावाचा सरपंच म्हणून शपथही घेतली. एवढा सगळा प्रकार होऊनही पोलिसांना याचा जराही सुगावा लागला नाही.

संजय सिंह यास अटक, संबंधित पोलिसांवर कारवाईचा आदेश !

हा प्रकार समजताच उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने संजय सिंहला अटक करत कारागृहात डांबले. या प्रकाराचा सुगावा न लागणारे पोलीस निरीक्षक धर्मेंद्र सिंह, महेशचंद्र शर्मा, महिला पोलीस कर्मचारी सरोज आणि हवालदार मोहित नौटियाल यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपमहानिरीक्षक शलभ माथुर यांनी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.