केरळ येथील कोची सेवाकेंद्रात गुरुपादुकांची प्रतिष्ठापना करतांना श्री. वाल्मिक भुकन यांनी अनुभवलेली भावावस्था !

श्री. वाल्मिक भुकन

१. ‘गुरुपादुकांची प्रतिष्ठापना करायची आहे’, हे समजल्यापासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सतत प्रार्थना होऊन त्यांच्या अनुसंधानात राहता येणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत दक्षिण भारतात गेलो असता ‘मला केरळ येथील कोची सेवाकेंद्रात गुरुपादुकांची प्रतिष्ठापना करायची आहे’, असे समजले. हे कळल्यानंतर माझ्या मनामध्ये पुष्कळ कृतज्ञताभाव जागृत झाला. तेव्हापासून मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘माझी काहीच पात्रता नसतांनाही तुम्ही मला एवढी मोठी सेवेची संधी देत आहात. ही सेवा तुम्हाला अपेक्षित अशी तुम्हीच माझ्याकडून करवून घ्या’, अशी दिवसभर प्रार्थना करत होतो. त्यामुळे मला गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाता येऊ लागले. माझ्या मनाची स्थिती संपूर्ण सकारात्मक राहून मी भावस्थितीत होतो. मी प्रत्यक्ष पूजेच्या दिवशी ठेवलेला भाव आणि त्यानुसार माझ्याकडून घडलेली प्रत्येक कृती, ही एक दैवी अनुभूतीच होती.

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंनी ‘साक्षात् गुरुदेव समोर आहेत’, याच भावाने सेवा करण्यास सांगून ‘मनाची निर्विचार स्थिती झाल्यावर पादुका सजीव झालेल्या दिसून गुरुदेवांचे दर्शन होईल’, असे सांगणे

पूजेच्या दिवशी सकाळी माझे या पूजाविधीविषयी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांच्याशी बोलणे झाले. मी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंना विचारले, ‘‘हा विधी गुरुदेवांना अपेक्षित असा होण्यासाठी मी तो करतांना कसा भाव ठेवायचा ?’’ त्यावर मला श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंनी सांगितले, ‘‘या संपूर्ण पूजाविधीमध्ये तुझे तुझ्या मनाच्या स्थितीकडे लक्ष असू दे. प्रत्येक कृती भावपूर्ण करायची. ‘साक्षात् गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) समोर बसले आहेत आणि हे सर्व पहात आहेत’, हा भाव सतत मनामध्ये ठेव. विधी चालू होण्यापूर्वी आणि विधी चालू असतांना मधे-मधे प्रार्थना करत रहा. पूजाविधी करतांना मन निर्विचार असेल, तर प्रार्थना नाही झाली, तरी चालेल. ही स्थिती अखंड टिकवून ठेव.’’ शेवटी त्या म्हणाल्या, ‘‘तुला त्या ठिकाणी पादुका सजीव झालेल्या दिसतील आणि गुरुदेवांचे दर्शन होईल. ते साक्षात् तिथे उभे राहिलेले तुला दिसतील.’’

३. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंनी सांगितल्याप्रमाणे भाव ठेवण्याचे प्रयत्न केल्यावर पूजाविधीतील प्रत्येक कृती ‘गुरुदेव समोर बसले आहेत’, असे समजून केल्याने भावजागृती होणे

मी आतापर्यंत असा पूजाविधी कधी केला नव्हता. त्यामुळे मी प्रथम प्रार्थना केली, ‘हे गुरुमाऊली, तुम्हाला अपेक्षित असा पूजाविधी तुम्हीच करवून घ्या.’ पूजा करत असतांना मला ‘मी प्रत्येक कृती गुरुदेवांच्या चरणांशी बसून करत आहे’, असे दिसत होते. गुरुदेवांच्या चरणांसमोर बसून मी त्यांच्या चरणांवर हळद, कुंकू, गंध, फूल इत्यादी अर्पण करत आहे’, असे मला दिसत होते. मी धूप आणि दीप ओवाळतांना प्रत्यक्ष गुरुदेवांचे चरणच मला दिसत होते. त्यामुळे त्या सर्व कृती भावपूर्ण होत होत्या. नैवेद्य अर्पण करतांना ‘मी तो गुरुदेवांनाच भरवत आहे’, अशा भावाने अर्पण केला.

४. आरती करतांना कृतज्ञताभाव जागृत होऊन अंतर्मन भावमय होणे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन होणे

आरती करतांना माझा कृतज्ञताभाव अखंड जागृत झाला होता. माझी पुष्कळ भावजागृती होत होती. यापूर्वी भावजागृती होत असतांना माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू यायचे; परंतु या वेळी माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू अल्प प्रमाणात आले होते. या वेळी माझे अंतर्मन पूर्ण भावमय झाले होते. आरती ओवाळत असतांना मला प्रत्यक्ष श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन झाले. ‘त्या माझ्या बाजूलाच उभ्या आहेत’, असे मला जाणवत होते.

५. गुरुपादुकांची पूजा करतांना ‘गुरुपादुका सजीव होऊन मला चैतन्य देत आहेत’, असे मला जाणवत होते.

६. संपूर्ण पूजाविधी करतांना आणि नंतरही मन निर्विचार होऊन ही स्थिती साधारण ३ – ४ घंटे टिकून रहाणे

हा विधी करतांना माझ्या मनामध्ये कुठलाही विचार न येता मन अगदी निर्विचार स्थितीत होते. माझी प्रत्येक कृती आपोआपच भावपूर्ण होत होती. त्यामुळे मला प्रत्येक कृती भावपूर्ण आणि चुकांविरहित होण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता भासली नाही. गुरुमाऊलीच (परात्पर गुरु डॉ. आठवले) माझ्याकडून हे सर्व करून घेत होती. पूजाविधी कधी संपला, हे माझ्या लक्षातही आले नाही. पूजाविधीनंतर साधारण ३ – ४ घंटे मनाची निर्विचार स्थिती अखंड टिकून होती.

७. कृतज्ञता आणि प्रार्थना

पूजाविधी झाल्यानंतर मी गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ‘गुरुदेव, तुमच्या कृपेमुळेच मला हा पूजाविधी करण्याची संधी मिळाली. हा विधी करत असतांना तुम्ही मला दर्शन दिलेत, त्यासाठी मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’ त्यानंतर मी गुरुदेवांना प्रार्थना केली. ‘हे गुरुदेव, आम्हा सर्वांची आध्यात्मिक उन्नती करून घ्या. हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होण्यासाठी आम्हाला चैतन्य द्या. आजचा हा दिवस माझ्या सदैव स्मरणात राहून तुम्हाला अपेक्षित अशी गुरुसेवा तुम्हीच माझ्याकडून करवून घ्या. मला तुमच्या चरणांजवळ ठेवा आणि तुम्ही माझ्या हृदयामध्ये सदोदित रहा. हा विधी करत असतांना माझ्याकडून काही त्रुटी राहिल्या असतील, तर मला क्षमा करा, अशी तुमच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’

– श्री. वाल्मिक भुकन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.३.२०१९)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक