१. साधनामार्गामध्ये अनेक पावले चालूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली परेच्छा आणि ईश्वरेच्छा ही दोन पावले उचलायला जड जाणे; मात्र ‘त्यांनी सांगितले आहे, तर ते करवून घेणार आहेत’, याची निश्चिती असणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे, ‘‘मोक्ष हा दोन पावलांवर आहे. पहिले पाऊल म्हणजे परेच्छा आणि दुसरे पाऊल म्हणजे ईश्वरेच्छा ! स्वेच्छेने वागणारा मनुष्य म्हणजे देहधारी प्राणी आहे. त्याच्यात आणि प्राण्यात इतकाच भेद आहे की, माणसाला प्राण्याप्रमाणे शिंगे आणि शेपूट नसते.’’ साधनेच्या दृष्टीने हे सूत्र मला फार महत्त्वाचे वाटले; म्हणून मी परेच्छेने वागण्यास आरंभ केला; मात्र माझ्यासारख्या संसारात रहाणार्या माणसाला हे फार कठीण वाटले. काही प्रसंगांत आणि काही व्यक्तींच्या संदर्भात मी परेच्छेने वागू शकलो. मी माझ्या ७३ वर्षांच्या जीवनात वेगवेगळ्या मार्गांनी साधनेचे प्रयत्न केले; म्हणजे अनेक पावले चाललो, तरी मला परेच्छा आणि ईश्वरेच्छा ही दोन पावले उचलायला जड जात होती. मला ही पावले म्हणजे श्रीविष्णूच्या वामन अवताराची विराट पावले वाटली; मात्र ‘हे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले आहे, तर ते माझ्याकडून करवून घेणार आहेत’, याची मला निश्चिती होती.
२. कुलदेवतेच्या नामस्मरणाने साधनेला आरंभ करणे आणि कुलदेवतेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील गुरुतत्त्वाची भेट घालून देणे
परात्पर गुरु डॉक्टरांनी कलियुगातील मानवासाठी ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगितलेला आहे. यामध्ये ‘स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, नाम, सत्संग, सत्सेवा, भावजागृती, त्याग आणि प्रीती’ ही अष्टांगे आहेत. आरंभी मी कुलदेवतेच्या नामस्मरणाने साधनेला आरंभ केला. माझ्या कुलदेवतेने मला परात्पर गुरु डॉक्टरांमधील ‘गुरुतत्त्वा’ची भेट घालून दिली. त्यांनी माझ्यावर गुरुकृपा केली. ते मला त्यांना ठाऊक झालेल्या आणि त्यांनी स्वतः अंगीकारलेल्या मार्गाने ‘मोक्ष’ या स्थानापर्यंत घेऊन जात आहेत.
३. स्वभावदोष आणि अहं यांमुळे साधनेचे अपेक्षित फळ न मिळणे आणि काही वेळा साधनेत घसरणही होणे
आरंभी मी गुरुकृपेने नाम घेण्याचा, सत्संगात रहाण्याचा आणि सेवा करण्याचा प्रयत्न केला; मात्र मला त्याचे अपेक्षित फळ मिळत नव्हते; कारण माझ्यातील लक्षावधी जन्मांच्या संस्कारांमुळे माझ्या साधनामार्गात स्वभावदोष आणि अहं हे मोठे अडथळे होते. हे अडथळे पार केल्याविना साधनेची उर्वरित अंगे नीट होत नव्हती. काही वेळा साधनेत माझी घसरणही झाली. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधनेतील अष्टांगांमध्ये स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाला ६० टक्के महत्त्व दिले आहे. त्यांनी स्वेच्छेकडून परेच्छेकडे आणि परेच्छेकडून ईश्वरेच्छेकडे जाण्यास सांगितले आहे.
४. परेच्छेने वागल्यामुळे ‘स्व’चे विचार आणि अहंचा भाग न्यून होणे, त्यातून आनंद मिळू लागणे अन् ‘ईश्वरेच्छा काय असते ?’, हे थोडेफार लक्षात येऊ लागणे
मी स्वेच्छेकडून परेच्छेकडे जाण्यासाठी साधनेच्या दृष्टीने माझ्या संपर्कात येणार्या व्यक्तींचे लहानसहान प्रसंगांतील म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याचा आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला. आरंभी माझ्या मनाचा संघर्ष झाला. नंतर हळूहळू माझ्या मनातील ‘स्व’चे विचार न्यून झाले आणि अहंचा भाग न्यून होऊन मला त्यातून आनंद मिळू लागला. त्यानंतर मला ‘जे काही होत आहे, ते ईश्वरेच्छेने होत आहे’, याची जाणीव व्हायला लागली, म्हणजे ‘ईश्वरेच्छा काय असते ?’, हे थोडेफार माझ्या लक्षात येऊ लागले.
५. श्रीविष्णुरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधक ‘स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा’ ही ३ पावले उचलण्याचा प्रयत्न करत असणे
जसे आई तिच्या लहान मुलाला पाऊल उचलण्यास शिकवते, तसे परात्पर गुरु डॉक्टरांनी मला परेच्छेने आणि ईश्वरेच्छेने वागायला शिकवले. वामन अवतारात वामनाने ३ पावलांत स्वर्गादी उच्चलोक, पृथ्वी आणि पाताळ व्यापले होते. त्याप्रमाणे साधक श्रीविष्णुरूपी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने ‘स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा’ ही ३ पावले उचलण्याचा प्रयत्न करत आहेत.’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.७.२०२०)