संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे वाखरी (पंढरपूर) येथे आगमन !

आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे रात्री वाखरीमध्ये आगमन

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – विविध रंगांच्या फुलांनी सजवण्यात आलेल्या शिवशाही बसमधून आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे रात्री वाखरीमध्ये आगमन झाले. या वेळी ‘पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा जयघोष करण्यात आला. भक्तीमय वातावरणात पादुकांचे येथे आगमन झाले.

प्रतिवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतून लाखो विठ्ठलभक्त पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पायी येत असत; मात्र मागील वर्षीपासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पायी वारीसाठी निर्बंध घातल्याने आषाढी एकादशी सोहळा प्रतिकात्मक स्वरूपात साजरा करण्यात येत आहे.

आळंदीतून (पुणे) संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चलपादुकांचे पंढरीकडे शाही प्रस्थान

संत ज्ञानेश्वर

आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींच्या चांदीच्या चलपादुकांचे पंढरपूर येथे सकाळी शाही प्रस्थान झाले. शासनाकडून पालखी प्रवासासाठी देण्यात आलेल्या दोन्ही विशेष बसमध्ये निमंत्रित ४० वारकर्‍यांसमवेत पोलीस बंदोबस्तात १९ जुलै या दिवशी सकाळी सव्वानऊ वाजता पंढरपूरला मार्गस्थ झाल्या.

१९ जुलै या दिवशी पहाटे घंटानाद झाल्यानंतर आजोळघरात माऊलींच्या पादुकांना पालखी सोहळाप्रमुख विकास ढगे-पाटील यांच्या हस्ते पवमान अभिषेक, दुधारती करून त्यांची महापूजा करण्यात आली. प्रमुख ब्रह्मवृंदांच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख करण्यात आला. सकाळी ७ वाजता माऊलींच्या चलपादुकांसमोर दैनंदिन कीर्तन सेवा पार पडली. हरिनामाच्या गजरात माऊलींच्या पादुका बसमध्ये फुलांनी सजवलेल्या पहिल्या आसंदीवर विराजमान झाल्या.

संत तुकाराम महाराजांच्या चलपादुकांचे पंढरीकडे प्रस्थान

संत तुकाराम महाराज

देहू (जिल्हा पुणे) – शासनाकडून देण्यात आलेल्या दोन्ही विशेष शिवशाही बसमध्ये निमंत्रित वारकर्‍यांसमवेत संत तुकाराम महाराजांच्या पादुका सकाळी पंढरपूरला रवाना झाल्या. त्यापूर्वी पहाटे ४ वाजता नितीन महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर ५.३० वाजता पादुका पूजन झाले. सकाळी ७ वाजता चलपादुकांसमोर दैनंदिन कीर्तन सेवा पार पडली. पालखी सोहळाप्रमुख भानुदास मोरे यांनी पादुका हातात घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर पादुका बसमध्ये फुलांनी सजवलेल्या पहिल्या आसंदीवर विराजमान झाल्या.