महाराष्ट्रात भगव्या झेंड्याचा अपमान चालू असून वारकर्‍यांच्या पताका, टाळ, चिपळ्या काढून घेतल्या जातात ! – ह.भ.प. संतवीर बंडातात्या कराडकर

ह.भ.प. संतवीर बंडातात्या कराडकर

पुणे – गेले ४ मास वारकर्‍यांचे आंदोलन ज्या पद्धतीने गुंडाळण्यात आले, त्यावरून महाराष्ट्रात भगव्या झेंड्याचे राज्य आहे, असे वाटत नाही. भगव्या झेंड्याचा अपमान चालू असून, वारकर्‍यांच्या पताका, टाळ, चिपळ्या काढून घेतल्या जात आहेत. ‘वारकर्‍यांचा पोशाख परिधान करून चालू नका’, असा पोलीस दम देतात, असे प्रतिपादन ह.भ.प. संतवीर बंडातात्या कराडकर यांनी केले. पंढरपूर येथे २० जुलै या दिवशी आषाढी यात्रा पार पडणार असून, त्यासाठी आज संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मार्गस्थ झाल्या. त्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत २० जुलै या दिवशी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची पूजा पार पडणार आहे.

ह.भ.प. संतवीर बंडातात्या कराडकर मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही दडपशाहीने महाराष्ट्रातील पायीवारी सोहळे रहित केले. त्यामुळे तुमची पूजा पांडुरंग स्वीकारेल, असे वाटत नाही. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या पूजेला येण्याचे टाळावे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी वारीवर राज्य सरकारने निर्बंध लादले आहेत. यावर ह.भ.प. संतवीर बंडातात्या यांनी वारकर्‍यांना पायी दिंडी काढण्याचे आवाहन केले होते; मात्र त्यानंतर त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते.