नगर येथे दळणवळण बंदीच्या काळात बैलगाडा शर्यती घेतल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा नोंद !

आयोजकांवर गुन्हे नोंद करण्यासमवेत त्यांना त्वरित कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

नगर, १७ जुलै – येथील पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या अल्प होत नसल्याने २२ गावांत दळणवळण बंदी घोषित केली आहे. अशा परिस्थितीत शिरापूर गावात बैलगाडा शर्यती चालू असल्याची माहिती मिळताच पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे पोलीस पथकासह गावात आल्या; मात्र पथक गावात पोचेपर्यंत शर्यती संपवून सर्वजण निघूनही गेले होते. या संबंधी ग्रामपंचायतीतील कर्मचार्‍याच्या भ्रमणभाषमध्ये मिळालेली ध्वनीचित्रफित आणि ग्रामपंचायती मधील नोंदवहीत शर्यतीमध्ये सहभाग घेतलेल्यांच्या नोंदींच्या आधारे पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घटनास्थळी शर्यत भरवल्याच्या खुणा, उधळलेला भंडारा आढळून आला. त्यावरून शर्यती होऊन गेलेल्या माहितीला पुष्टी मिळाली. ग्रामविकास अधिकारी मीना काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शर्यत आयोजित करणारे गुंडा भोसले, संभाजी नरसाळे यांच्यासह अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या नोंदवहीत ५६ लोकांची नावे आहेत. त्यांनी यामध्ये सहभाग घेतल्याचे दिसून येत असल्याने त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.