गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे भाजपच्या बैठकीत २ नेत्यांमध्ये हाणामारी !

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अशा प्रवृत्तीच्या नेत्यांना समज द्यावी, ही अपेक्षा !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – जातीवाचक शिवीगाळ केल्याने भाजपच्या कार्यकारणीच्या बैठकीत २ नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणात एका कार्यकर्त्यालाही मारहाण करण्यात आल्याने त्याला रुग्णालयात भरती करावे लागले. नंतर त्याने सिहानी गेट पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

गाझियाबादमधील प्रदेश कार्यकारणीमधील सर्व सदस्यांना नेहरूनगरमधील पक्ष कार्यालयात बोलवण्यात आले होते. त्या वेळी येथे असणारे भाजपच्या प्रदेश समितीचे सदस्य पृथ्वी सिंह आणि पवन गोयल यांच्यात शहरातील विधानसभा क्षेत्राविषयी चर्चा चालू होती. तेव्हा तेथे माजी आमदार प्रशांत चौधरी आले. त्यावर पवन गोयल यांनी ‘तुम्ही मध्ये का बोलत आहात ?’ असा प्रश्‍न चौधरी यांना विचारला. यावरून दोघांमध्ये वादावादी होऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. या प्रकरणानंतर गोयल यांचा भाऊ मनीष यांनी पोलिसांकडे प्रशांत चौधरी यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार प्रविष्ट केली. गोयल यांनी जातीवाचक विधान केल्याने ही हाणामारी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.