पाकिस्तानकडून ग्वादर शहराजवळील अरबी समुद्रात मासेमारी करणार्‍या चिनी नौका जप्त

चीन संपूर्ण पाकवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतांना अशा प्रकारची वरवरची कारवाई करून पाक काहीही साध्य करू शकणार नाही, हे पाकला लक्षात येईल, तो सुदिन !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकने ग्वादर शहराजवळील अरबी समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणार्‍या ५ चिनी नौका जप्त केल्या. स्थानिक मासेमारांनी चिनी नौकांकडून होणार्‍या मासेमारीविषयी आवाज उठवल्यानंतर पाकिस्तानी प्रशासनाने ही कारवाई केली. ग्वादरमध्ये चीन ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटीव्ह’च्या माध्यमातून ग्वादर बंदर विकसित करत आहे.

१. मागील ५ दशकांपासून मासेमारी करणारे ७० वर्षीय अकबर रास यांनी ‘चिनी ट्रॉलर्स आमची उपजीविका संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहेत’, असा आरोप केला. ‘चिनी ट्रॉलर्स’ना मासेमारी न करण्याचा आदेश सरकार देईपर्यंत आमचे आंदोलन चालू रहाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

२. ग्वादर बंदराचे दायित्व असणार्‍या ‘चायना ओव्हरसीस पोर्ट होल्डिंग कंपनी’चे अध्यक्ष झांग बाओझोंग यांनी पाकिस्तानी मासेमारांचे आरोप फेटाळून लावले आहेत. वादळापासून बचाव करण्यासाठी आमच्या ‘ट्रॉलर्स’ने या बंदरामध्ये आश्रय घेतला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.