पुणे, १४ जुलै – राज्यात तुकडेबंदी कायदा असला, तरी एखाद्या सर्व्हे क्रमांकाचे क्षेत्र हे २ एकर असेल आणि त्याचा सर्व्हे क्रमांकामधील एक, दोन किंवा तीन गुंठे विकत घेतले जाणार असल्यास त्यांची दस्तनोंदणी होणार नाही; मात्र त्याच सर्व्हे क्रमांकाचे रेखांकन (ले-आऊट) करून एक, दोन, तीन गुंठ्यांचे तुकडे पाडून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची संमती घेतल्यास संबंधित व्यवहारांची नोंदणी होऊ शकणार आहे असे आदेश राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. या महानिरीक्षकांच्या नवीन आदेशामुळे नागरिकांना पूर्व अनुमतीने अल्प क्षेत्रफळावर घरे बांधता येणार आहेत.
यापूर्वी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा अल्प तुकड्यांची खरेदी झाली असल्यास संबंधित भूमीच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठी कायद्यातील ‘कलम ८ ब’नुसार जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकारी यांची अनुमती आवश्यक आहे, असेही आदेशात नमूद केले आहे. भूमीचे तुकडे करून त्याची विक्री करण्याचे प्रकार वाढत होते. त्याची चौकशी केली असता, एक-दोन गुंठ्यांचे व्यवहार होऊन त्यांची दस्तनोंदणी झाल्याचे आढळून आले होते.