१. कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ येण्याच्या आधी विविध प्रसंगांतून मनात असलेली भीती न्यून होऊन परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा अनुभवणे
अ. ‘३०.४.२०२१ या दिवशी मला ताप आला. त्या वेळी ‘मला कोरोना झाला आहे’, असे मला वाटले. कोरोनाच्या संसर्गाविषयी माझ्या मनात पुष्कळ भीती आणि कुटुंबियांची चिंता होती. मी नेहमी आमच्या आधुनिक वैद्यांकडून उपचार घेतो; परंतु या वेळी मी एका साधकाला कोरोना झाल्यानंतर त्यांच्यावर योग्य उपचार करणार्या आणि त्यांची काळजी घेण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करणार्या अन्य एका आधुनिक वैद्यांकडे गेलो. देवाच्या कृपेने त्यांनी त्वरित योग्य उपचार चालू केले आणि कोरोना चाचणी करण्यास सांगितली. ‘मी उपचारांसाठी कोणत्या आधुनिक वैद्याकडे जावे, याचे गुरुदेवांनीच नियोजन करून मला योग्य निर्णय घेण्यास साहाय्य केले’, असे मला वाटले.
आ. मला कोरोनाचा संसर्ग होण्याच्या आधी काही दिवसांपूर्वीच माझ्या जवळच्या एका कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्याकडून मला उपचाराविषयी माहिती मिळत होती.
इ. मी कोरोना चाचणी केल्याविषयी सनातनच्या साधिका सौ. प्रीती कुलकर्णी यांना कळवले. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मला त्वरित आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यासाठी नामजप मिळाला. ‘महाशून्य’ हा नामजप ३ घंटे आणि कोरोना संसर्गात आध्यात्मिक बळ वाढण्यासाठी ‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री गुरुदेव दत्त – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप मला २ घंटे करण्यास सांगितले. देवाच्या कृपेने माझा नामजपही होत होता.
२. कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्यावर मन स्थिर ठेवून उपचार घेता येणे आणि गुरुदेवांच्या अस्तित्वाची जाणीव होणे
२ अ. कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्यावर ‘एका संघटनेच्या ‘कोविड केअर सेंटर’मध्ये चांगले उपचार मिळतात’, असे समजल्यावर भीती न्यून होणे : ४.५.२०२१ या दिवशी माझी कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ (सकारात्मक) आला. गुरुदेवांच्या कृपेमुळे त्या वेळी माझ्या मनात भीती अथवा काळजीचे विचार न येता ‘यापुढे काय करायचे ?’, हे विचार येऊ लागले. एका संघटनेच्या वतीने कर्वेनगर या भागात ‘कोविड केअर सेंटर’ चालू आहे’, असे वाचले होते. मी त्वरित माझ्या मित्राकडून माहिती घेऊन तेथील ‘केअर सेंटर’मध्ये भरती झालो. माझा मित्र आणि त्यांचा भाऊ यांच्या कुटुंबियांनी कोरोना झाल्यावर तिथे उपचार घेतल्याने मला ‘तिथे चांगले उपचार होतात’, हे समजले. त्यामुळे माझी भीती न्यून झाली.
२ आ. ‘कोविड केअर सेंटर’मध्ये असतांना ‘रामनाथी आश्रमातच रहात असून परात्पर गुरु डॉक्टरांचे लक्ष आहे’, असे वाटणे : ‘कोविड केअर सेंटर’मध्ये कार्यरत असणारे स्वयंसेवक आपलेपणाने सेवा करत होते. तेथील स्वच्छता, न्याहरी, जेवण आणि अन्य व्यवस्था पुष्कळ चांगली होती. त्यामुळे ‘मी तिथे रुग्णाईत होऊन उपचार घेत आहे’, असे मला वाटत नव्हते. अनेकदा तेथील व्यवस्था, खोल्या आणि जिने पाहून ‘मी रामनाथी आश्रमातच आहे’, असे मला वाटायचे. तिथे असतांना माझ्या शरिरावर दैवी कण दिसत होते. त्यामुळे ‘गुरुदेवांचे माझ्यावर लक्ष आहे’, याची मला अनुभूती आली.
३. ‘कोविड केअर सेंटर’मधून घरी परत आल्यावर अलगीकरणासाठी सदनिका मिळाल्यामुळे आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे नियोजन करता येणे आणि नामजपामुळे शारीरिक अन् मानसिक बळ मिळणे
मला ‘कोविड सेंटर’मधून घरी परत आल्यावर ७ दिवस गृह अलगीकरणात रहायला सांगितले होते. ‘घरात आई-वडील, पत्नी आणि लहान मुलगा असल्याने कसे रहायचे ?’, याची मला काळजी वाटत होती. घरात योग्य त्या सुविधाही उपलब्ध नव्हत्या; पण गुरुदेवांनी येथेही आम्हा सर्वांची काळजी घेतली. आमच्याच इमारतीमध्ये ओळखीच्या गृहस्थांनी सदनिका भाड्याने घेतली होती; परंतु दळणवळण बंदीमुळे ते गावी गेले होते. त्यांची सदनिका वापरण्याविषयी त्यांना विचारल्यावर ते त्वरित ‘हो’, म्हणाले.
देवाच्या कृपेने आध्यात्मिक उपायांसाठी मिळालेल्या नामजपाचे नियोजनही करता आले. नामजपामुळे मला शारीरिक आणि मानसिक बळ मिळाले. ‘माझ्या मनातील भीती आणि नकारात्मक विचार न्यून होऊन माझा उत्साह वाढला’, असे मला वाटले. या संपूर्ण परिस्थितीत ‘मला कोरोना होणार’, हे माझ्या प्रारब्धात होते; पण त्याला सर्वच प्रकारे सामोरे जाण्यासाठी गुरुदेवांनी आधीच माझे नियोजन केले होते. यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. मंदार भोपळे, कोथरूड, पुणे. (१५.६.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |