शासनाने वासरांच्या वाटपासह काही कालावधीपर्यंत त्यांच्या चार्याचीही सोय करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा दुर्बल घटकांना चार्यासाठी वणवण करावी लागेल !
बेंगळुरू (कर्नाटक) – हुतात्मा सैनिकाची पत्नी, देवदासी, मृतांवर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी आणि विधवा या दुर्बल घटकांना आर्थिक साहाय्य म्हणून उत्कृष्ट वंशाच्या गायींची वासरे ‘अमृत सिरी’ या योजनेअंतर्गत अल्प दरात देण्यात येतील, अशी माहिती पशुसंगोपन सचिव प्रभु चव्हाण यांनी दिली.
चव्हाण म्हणाले की, बाजार भावाच्या २५ टक्के दराने गायींच्या वासरांचे वितरण करण्यात येईल. देशी वंशाच्या गायींची संख्या वाढवण्यासही हे साहाय्यभूत ठरील. जाती संवर्धन केंद्रात आवश्यक तेवढी वासरे ठेवून उरलेली वासरे देण्यात येतील. हळ्ळीकार, अमृत महल, मलेनाड गिड्ड, खिलारी आणि कृष्णव्याली जातींच्या गायींची वासरे या उद्देशासाठी राखून ठेवण्यात येतील. राज्यात १९ जाती संवर्धन केंद्रे असून त्यांच्या व्याप्तीतील जिल्ह्यांत ९२७ गायी देण्यात येतील. तालुका पशु वितरण समितीच्या वतीने निवड प्रक्रिया चालू आहे.