पायी वारीतील माऊलींच्या मुक्कामाच्या ठिकाणी दर्शन आणि आरती
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वंशपरंपरागत चोपदार राजाभाऊ चोपदार आणि रामभाऊ चोपदार या बंधूंनी आळंदी ते पंढरपूर असा प्रवास केला. या वेळी त्यांनी पायी वारीतील प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी १ किलोमीटर चालत माऊलींच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन दर्शन आणि आरतीही केली.
वारीची परंपरा शेकडो वर्षांची आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील २ वर्षे पायी पालखी सोहळा झाला नाही. पायी वारीच्या कालावधीत प्रतिवर्षी मुक्कामाच्या दिवशी वारीच्या वाटेवरील लोकांची भेट होत असे; मात्र कोरोनामुळे वारी न झाल्याने या सर्वांची भेट झाली नव्हती. त्यामुळे पालखी सोहळ्याच्या वाटेतील गावकर्यांची भेट व्हावी, यासाठी आळंदी ते पंढरपूर हा प्रवास केला, असे राजाभाऊ आणि रामभाऊ चोपदार यांनी सांगितले.