प.पू. डॉक्टरबाबा,
शिरसाष्टांग नमस्कार !
प.पू. डॉक्टरबाबा, १५.५.२०१९ या दिवशी एका साधकाच्या समवेत चर्चासत्संग चालू होता. त्या वेळी विषयाच्या ओघात माझ्याकडून आपण कवितेच्या माध्यमातून प्रार्थनाच लिहून घेतली. त्यात ‘मला मोक्ष नको, मुक्ती नको, तर ‘प्रत्येक जन्मात तुमच्या सेवेचीच संधी मिळावी’, अशी इच्छा व्यक्त केली आहे. माझी ही इच्छा योग्य कि अयोग्य हे मला ठाऊक नाही. नंतर एका संतांनी असेच मागणे मागितले होते; परंतु ‘ते पुढील टप्प्यातील संत आहेत’, हे लक्षात आले. तेव्हा माझ्या मनात एक शंका आली, ‘मोक्ष आणि मुक्ती ही अंतिम अवस्था नाही का ? अंतिम अवस्था असेल, तर माझी प्रार्थना पुढील टप्प्याची असेल का ?’ माझे या विषयीचे चिंतन १५.५.२०१९ या दिवशी चालू होते. तेव्हा आणखी एक विषय माझ्या मनात होता आणि या दोन्ही विषयाची व्यवस्थित मांडणी करून ‘१७.५.२०१९ या दिवशी आपल्याला पत्र लिहावे’, असा माझा मानस होता. मी या दिवशी पत्र लिहिण्याचे पुष्कळ प्रयत्न केले; पण ते पूर्णत्वास गेले नाहीत. १८.५.२०१९ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आपली ‘ईश्वरेच्छेचे पालन करणे हाच मोक्ष’, अशी एक चौकट आली होती. ती वाचून माझ्या शंकेचे निरसन झाले. तेव्हा ‘१७.५.२०१९ या दिवशी माझ्याकडून पत्र का लिहिले गेले नाही ?’, याचा कार्यकारणभाव माझ्या लक्षात आला.
घ्या आता सामावून । चरण रजकणांच्या समुहात ।
कशी वर्णावी थोरवी ? ।
शब्द अपुरे पडती ।। १ ।।
कितीही केले प्रयत्न ।
सारे पडती तोकडे ।। २ ।।
कसे असती गुरु ? ।
शब्दांपलीकडील कोडे ।। ३ ।।
किती सोडवता सोडवले ।
तरी गुंता गुंततो गुंत्यात ।। ४ ।।
भाव-भावनांचा कल्लोळ ।
शरणागत होऊनी सुटतो ।। ५ ।।
आनंदाचा महापूर येतो ।
जेव्हा कृपेचा ओघ कळतो ।। ६ ।।
आनंदे आनंदाचा वर्ग ।
पुनःपुन्हा अनंत डुंबतो ।। ७ ।।
सतत अनुभूतीचा खेळ ।
संसार अध्यात्माचा चालतो ।। ८ ।।
नतमस्तक व्हावे कैसे ? ।
हेही विसरून जातो ।। ९ ।।
भानावर फिरून येता ।
एक हात मस्तकी दिसतो ।। १० ।।
घ्या आता सामावून ।
चरण रजकणांच्या समुहात ।
रजकणांच्या समुहात ।। ११ ।।
– श्री. मुकुंद ओझरकर, नाशिक (१९.५.२०१९)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |