गुरुदेवांवरील अपार श्रद्धेच्या बळावर संकटाला धीरोदात्तपणे सामोर्‍या जाणार्‍या पुणे येथील सौ. राधा सोनवणे !

कोरोना महामारीच्या घोर संकटात फुलाप्रमाणे जपणारी प.पू. गुरुमाऊली आणि गुरुदेवांवरील अपार श्रद्धेच्या बळावर संकटाला धीरोदात्तपणे सामोर्‍या जाणार्‍या अन् त्या कालावधीतही तळमळीने व्यष्टी आणि समष्टी साधना करणार्‍या पुणे येथील सौ. राधा सोनवणे !

सौ. राधा सोनवणे

१. मुलाचा कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक येणे, कुटुंबातील सर्वांना गुरुकृपेने हा प्रसंग स्वीकारता येणे

‘कोरोना महामारीच्या कालावधीत मुलाची प्रकृती बरी नसल्याने त्याला रुग्णालयात न्यावे लागले. त्या वेळी मला काळजी आणि भीती वाटत होती. ‘त्याच्या प्रकृतीत दोन-तीन दिवसांनंतरही सुधारणा होत नसल्याने त्याची कोरोनाची चाचणी करावी लागेल’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले. मुलाचा कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. ‘यजमान हा प्रसंग कशा पद्धतीने स्वीकारतील’, याची मला चिंता होती. ‘मुलगाही भावनाशील असल्याने त्याची स्थिती कशी असेल ?’, हा विचारही माझ्या मनात होता. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे घरातील सर्व सदस्यांनी हा प्रसंग सकारात्मक घेऊन उपाययोजना काढण्याची सद्बुद्धी सर्वांना मिळत होती.

२. घरातील अन्य व्यक्तींचे कोरोना चाचणीचे अहवाल सकारात्मक येऊनही गुरुकृपेने सर्व जण सकारात्मक असणे

आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘संपर्कात आलेल्या सगळ्यांची कोरोना चाचणी करायला हवी.’’ त्यानुसार कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी केली. मोठा मुलगा आणि सासरे यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल नकारात्मक आले; मात्र अन्य सर्व जणांचे अहवाल सकारात्मक आले. ‘या प्रसंगातही आम्हा सर्वांची स्थिती सकारात्मक ठेवणारे केवळ आणि केवळ परम पूज्य गुरुदेव आहेत’, हे मला सतत अनुभवता येत होते.

३. यजमानांची प्रकृती बिघडणे, त्यांच्या त्रासाची तीव्रता वाढणे आणि रात्रभर जागरण होणे

दोन दिवसांनी यजमानांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात घेऊन जावे लागले. यजमानांच्या छातीचा क्ष-किरण अहवाल सर्वसाधारण आल्याने त्यांना घरी घेऊन आलो. यजमानांना अस्वाथ्यामुळे रात्रभर झोप लागत नसे. त्यांना अनेक त्रास होत होते. त्या वेळी घरातील सर्व सदस्य जागे असायचे. त्या कालावधीत पितृपंधरवडा असल्याने संध्याकाळ झाली की, यजमानांच्या त्रासाची तीव्रता वाढत असे. रात्र झाली की, ‘कधी एकदा सकाळ होईल’, असे मला वाटत असे. या कालावधीत नातेवाइकांकडून सहकार्य न मिळाल्याने मला मानसिक ताण येत होता. यजमानांचा स्वभाव भावनिक असल्याने ते स्पष्ट बोलत नसत.

४. कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाल्याने सर्वांनाच घरची कामे करावी लागणे आणि त्या कालावधीत गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे

कुटुंबातील ६ सदस्यांना कोरोना झाल्यामुळे ‘कोण कुणाला औषध देणार ? कोण कुणाला जेवण वाढून देणार ?’, अशी परिस्थिती होती. सर्वांनाच घरातील सर्व कामे करावी लागत होती. गुरुकृपेमुळे आधीपासूनच कुटुंबातील सर्वांना सेवा करायची सवय असल्याने सर्व जण घरातील सर्व कामे करत असत. त्या वेळी आम्हाला जेवण जात नसे. अन्नपदार्थ गरम असतांना थोड्याफार प्रमाणात जेवू शकत होतो. त्या कालावधीत घरकामासाठी बाईही कामाला येत नव्हती. त्या वेळी गुरुदेवांचे अस्तित्व सतत जाणवायचे. ‘तेच माझ्याकडून आणि कुटुंबियांकडून कामे करवून घेत आहेत’, हे लक्षात येत होते.

५. साधकांकडून लाभलेले साहाय्य

‘या कालावधीत साधकांकडून मिळालेल्या आधारामुळे देव सतत कुणाच्या तरी माध्यमातून साहाय्य करत आहे’, याची पदोपदी अनुभूती येत होती.

५ अ. आधुनिक वैद्या ज्योती काळे यांनी वैद्यकीय स्तरावर साहाय्य करणे:  या वेळी आरोग्याची काळजी घेण्याच्या संदर्भात आधुनिक वैद्या ज्योती काळे यांचे पुष्कळ साहाय्य झाले. घर लहान आणि घरातील व्यक्तींची संख्या अधिक असल्याने सतत सर्वांचा जवळून संपर्क यायचा. आम्ही ज्योतीताईंना अनेक शंका विचारायचो. त्या आम्हाला वेळ द्यायच्या. त्यामुळे आम्हाला भीती वाटायची नाही. आम्ही सर्व जण नियमांचे पालन करत होतो.

५ आ. सौ. मनीषा पाठक यांनी आध्यात्मिक स्तरावर केलेले साहाय्य : मला सौ. मनीषाताईंच्या माध्यमातून आईच्या मायेचा ओलावा अनुभवता आला. त्या मला ‘ताई विश्रांती घ्या’, असे सतत सांगत असत. त्यांच्याशी सेवेसंदर्भात संपर्क झाल्यावर त्या प्रथम आमची विचारपूस करायच्या. घरात काही प्रसंग झाल्यास मनीषाताईंशी बोलल्यावर मला आध्यात्मिक आधार मिळायचा.

६. गुरुदेवांनी व्यष्टी आणि समष्टी साधना करवून घेणे

या कालावधीत गुरुदेवांनी माझ्याकडून प्रतिदिन पाच घंटे नामजप करवून घेतला. मला घरातील वातावरण आश्रमासम वाटायचे. माझ्याकडे पुणे येथील एका भागातील साधकांच्या साधनेचे दायित्व आहे. प.पू. गुरुदेव या सर्व स्थितीत माझ्यासारखा क्षुद्र जिवाकडून समष्टी सेवाही करवून घेत होते.

७. तीव्र प्रारब्ध गुरुमाऊलींच्या कृपेने सहजतेने भोगण्याची शक्ती मिळणे

आमचा विवाह झाल्यापासून ३० वर्षांच्या कालावधीत आमच्यावर असा प्रसंग कधीच ओढवला नव्हता. त्यामुळे आम्हाला अशा प्रसंगाला सामोरे जाण्याची सवय नव्हती; मात्र गुरुदेव सर्वांना या प्रसंगातून अलगदपणे बाहेर काढत होते. आम्हा सर्वांना तीव्र प्रारब्ध गुरुमाऊलींच्या कृपेने सहजतेने भोगण्याची शक्ती मिळाली. त्यांनी आम्हाला या संकटातून फुलाप्रमाणे अलगद बाहेर काढले.

प.पू. गुरुमाऊली आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे आम्हाला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची शक्ती मिळाली. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता ! प.पू. गुरुदेव, तुम्हाला अपेक्षित अशी साधना करण्यास मी अल्प पडत आहे, यासाठी मी प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी क्षमायाचना करते.’

– सौ. राधा अशोक सोनवणे, सिंहगड रस्ता, पुणे.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक