‘वर्ष २०२० च्या गणेशोत्सवामध्ये माझ्याकडून गुरुकृपेने भावाच्या स्तरावर पुष्कळ प्रयत्न होत होते. माझा श्री गणेशाविषयी बोलण्याचा भाग वाढला होता. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या मनात असलेली ‘घरी ११ दिवस गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करावी’, ही इच्छा या वर्षी पूर्ण झाली. गणेशोत्सवाच्या कालावधीत नवव्या दिवशी मला बराच ताप आला. तेव्हा २ दिवस माझी प्रकृती खालावली होती.
१. रुग्णालयात रक्त तपासणीसाठी गेल्यानंतर रुग्णांची भयावह स्थिती दिसणे आणि गुरुदेवांचा धावा केल्यावर कसलीही भीती अन् चिंता न रहाणे
मी चिकित्सालयात गेल्यानंतर मला तात्कालिक गोळ्या आणि औषधे देण्यात आली होती. त्याचा विशेष परिणाम न झाल्याने आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘कोरोनाची चाचणी करायला हवी.’’ मी तपासणी करण्यासाठी गेल्यावर रुग्णालयातील अनेक रुग्णांची भयावह स्थिती होती. माझा आतून गुरुदेवांचा पुष्कळ धावा होत होता आणि कृतज्ञताही वाटत होती की, माझ्यावर सदैव गुरुदेवांचा हात आहे. त्यामुळे कसलीही भीती आणि चिंता करण्याचे कारण नाही. माझा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला.
२. सौ. मनीषा पाठक यांनी ‘रुग्णाईत साधकांनी आजारपणात श्रद्धेने साधनेचे प्रयत्न करून आध्यात्मिक प्रगती करून घेतली’, याची अनेक उदाहरणे देऊन धीर देणे आणि नियमित व्यष्टी साधना केल्याने सकारात्मक राहू शकणे
सौ. मनीषा पाठक यांनी ‘रुग्णाईत साधकांनी या कालावधीत श्रद्धेने साधनेचे प्रयत्न करून आध्यात्मिक प्रगती करून घेतली’, याची अनेक उदाहरणे देऊन मला धीर दिला आणि माझे ध्येय सुस्पष्ट केले. त्यामुळे माझी श्रद्धा वाढली आणि गुरुकृपेने माझे मन स्थिर झाले. मनीषाताईंनी अन्य रुग्णाईत साधकांसह संपर्क करून ‘व्यष्टी साधनेचे प्रयत्न कसे करू शकतो ? दिवसभराचे चांगले वेळापत्रक कसे बनवू शकतो ? नियमित व्यष्टी आढावा घेऊन मनाची स्थिती कशी चांगली ठेवू शकतो ?’, या संदर्भात मार्गदर्शन केले. त्यामुळे ‘आजारपणात अन्य साधक कसे प्रयत्न करत आहेत ? कशी श्रद्धा ठेवत आहेत ?’, हे शिकायला मिळून पुष्कळ आधार वाटत असे. त्यामुळेही ‘मन सकारात्मक रहात आहे’, असे माझ्या लक्षात आले.
३. आजारपणाच्या कालावधीत नामजप करण्याला अधिक महत्त्व देणे
पाच घंटे नामस्मरण करणे, विश्रांती घेणे आणि व्यष्टी साधनेचा आढावा, असा दिनक्रम होता. गेली काही वर्षे माझा समष्टी सेवेत सहभाग वाढला होता. गुरुकृपेने मला समष्टी सेवेची पुष्कळ गोडीही लागली होती. उत्तरदायी साधकांच्या माध्यमातून या आजारपणाच्या कालावधीत ‘समष्टी सेवेपेक्षा नामजप करणे महत्त्वाचे आहे’, असे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे तसे प्रयत्न होऊ लागले.
४. डेंग्यू झाल्यावर पपईच्या पानांचा रस घेण्यासाठी एका साधकाने पपईची पाने देऊन साहाय्य करणे आणि ‘आपत्काळात साधकच साहाय्य करतील’, या गुरुदेवांच्या वाक्याची प्रचीती येऊन कृतज्ञता वाटणे
त्यानंतर ‘मला डेंग्यू झाला आहे’, असे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले. तेव्हा मला पपईच्या पानांचा रस घेणे अत्यावश्यक होते. ‘ही पाने आणायला कुणाला सांगणार ?’, असे मला वाटत होते. मी एका साधकांना भ्रमणभाष केल्यावर त्यांनी पपईची पाने, देशी गायीच्या दुधाचा खरवस आणि अन्य आयुर्वेदिक गोष्टी आणून दिल्या. तेव्हा ‘आपत्काळात साधकच साहाय्य करतील’, या गुरुदेवांच्या वाक्याची आठवण होऊन मला कृतज्ञता वाटली. संबंधित साधक मला प्रत्येक २ दिवसांनी पपईची पाने आणून देत होते. ते त्या कालावधीत पुष्कळ व्यस्त असतांनाही त्यांनी मला आवश्यक असणार्या गोष्टी आणून देण्यासाठी प्राधान्य दिले. तेव्हा मला त्यांच्यामधील ईश्वरी गुणांची जाणीव झाली.
५. ‘संकटकाळात केवळ भगवंतच वाचवू शकणार असणे आणि साधकांचे साहाय्य लाभणार असणे’, याची निश्चिती होऊन पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय दृढ होणे अन् गुरुमाऊलीप्रतीच्या श्रद्धेत वृद्धी होणे
‘हे गुरुमाऊली, या कालावधीत मला अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले. तेव्हा देवाने एक गोष्ट सुस्पष्ट केली, ‘पुढे संकटकाळात, अडचणींच्या काळात केवळ भगवंतच वाचवू शकतो अन् स्थुलातून साधकांच्या माध्यमातून साहाय्य प्राप्त होणार आहे.’ या प्रसंगांमुळे माझा पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय आणखी दृढ झाला. या प्रसंगांच्या माध्यमातून माझी आपल्यावरील श्रद्धा वाढण्यात साहाय्य झाले. मी आपल्या विश्वव्यापी चरणांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. शशांक सोनवणे, सिंहगड रस्ता, पुणे. (२४.१२.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |