मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या सूत्रावरून विधान परिषदेत गदारोळ

मुंबई – राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या सूत्रावरून विधान परिषदेत जोरदार गदारोळ झाला. ६ जुलै या दिवशी सभागृहात या विषयांवरील प्रस्ताव मांडून त्यावर सविस्तर चर्चा करण्यास अनुमती दिली जाईल, असे सभापती रामराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले; मात्र विरोधकांनी यावर आक्षेप घेत आजच चर्चा घडवून आणा, अशी मागणी लावून धरली. सभापतींनी ही मागणी फेटाळून लावल्याने विरोधकांनी आक्रमक होऊन सभागृहात घोषणा दिल्या. त्यामुळे झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

यासमवेतच विधान परिषदेत मराठा आरक्षणाच्या सूत्रावरून गदारोळ झाला. मराठा आरक्षणाची मागणी करत विरोधकांनी सदनात घोषणा दिल्यानंतर सदनाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.