डिचोली, ३ जुलै (वार्ता.) – राज्यशासनाने महाराष्ट्रातून गोव्यात प्रवेश करणार्या नागरिकांची गोवा-दोडामार्ग तपासनाक्यावर कोरोनासंबंधी ‘अॅन्टीजेन’ चाचणी करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या सीमेवरील अनेक नागरिक विशेषत: दुचाकीचालक कोरोनाची चाचणी करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसलेल्या म्हावळिंगे तपासनाक्यावरून गोव्यात प्रवेश करत आहेत. यामुळे गोव्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती म्हावळिंगेवासियांनी व्यक्त केली आहे. (प्रत्येक तपासनाक्यावर कोरोनाविषयक चाचणी करणे आवश्यक असतांना म्हावळिंगे येथील तपासनाक्यावर चाचणीची सुविधा का नाही ? अशा हलगर्जीपणामुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग न वाढल्यासच नवल ! – संपादक)
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक जण प्रतिदिन काम किंवा व्यवसाय यांच्या निमित्ताने गोव्यात येतात. गोव्यात प्रवेश करण्यासाठी सध्या प्रत्येकाकडे कोरोना ‘निगेटिव्ह’ प्रमाणपत्र किंवा तपासनाक्यावर कोरोनासंबंधी ‘अॅन्टीजन’ चाचणी करणे बंधनकारक आहे. डिचोली तालुक्यातील म्हावळिंगे तपासनाक्यावर कोरोनासंबंधी ‘अॅन्टीजन’ चाचणीसंबंधी कोणतीही सुविधा शासनाने उपलब्ध केलेली नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नागरिक गोव्यात प्रवेश करण्यासाठी या मार्गाचा अवलंब करत आहेत. प्रतिदिन सुमारे ३०० नागरिक गोव्यात प्रवेश मिळवण्यासाठी या मार्गाचा अवलंब करत आहेत. याचसमवेत गोव्यात प्रवेश करण्यासाठी माटणे, आंबाडगाव, वझरी आणि तेरेखोल या कोरोना चाचणीची सुविधा नसलेल्या गुप्त मार्गांचाही अवलंब केला जात आहे. चाचणीशिवाय लोकांना प्रवेश दिल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती म्हावळिंगेवासियांनी शासनाकडे व्यक्त केली आहे.