माडखोल धरणाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकाची नेमणूक

पर्यटकांकडून अनुचित प्रकार घडू नये, म्हणून उपाययोजना

माडखोल धरण

सावंतवाडी – तालुक्यातील माडखोल येथील धरण भरून वाहू लागले आहे. याच ठिकाणी ८ दिवसांपूर्वी २ तरुण पाण्यातून वाहून जात असतांना सुदैवाने वाचले. त्यामुळे अतिउत्साही लोकांमुळे कोणताही अनुचित प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार येथे सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पर्यटकांना येथे येण्यापासून रोखण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने सूचनाफलकही लावण्यात आले आहेत.

धरणाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी आणि आवश्यक त्या सुविधांसह सूचनाफलक तात्काळ लावण्यात यावेत, अशी मागणी माडखोल ग्रामस्थांच्या वतीने ‘जिल्हा बॅन्जो विकासमंडळा’चे अध्यक्ष लखन आडेलकर यांनी केली होती. याची नोंद घेत पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता संतोष कविटकर यांनी सूचनाफलक लावून सुरक्षारक्षकाची नेमणूक केली आहे, तसेच बुधवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धरणाजवळ गृहरक्षकदलाचे जवान (होमगार्ड) आणि पोलीस तैनात ठेवण्याविषयी प्रशासनाकडे लेखी पत्राने मागणी केल्याचे अभियंता कविटकर यांनी सांगितले. (धरणामध्ये उतरणार्‍या अतिउत्साही लोकांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली, तरच त्यांच्यावर जरब बसेल आणि प्रशासनाला अशा प्रकारे होमगार्ड अन् पोलीस यांना सुरक्षेसाठी तैनात करण्याची आवश्यकता भासणार नाही ! – संपादक)