पणजी – राज्यातील उपहारगृहे (हॉटेल) लवकरच अर्ध्या क्षमतेने चालू करण्याचे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘उपाहारगृहे अर्ध्या क्षमतेने चालू करण्याचा शासनाचा विचार आहे, तसेच मद्यालये उघडण्याच्या मागणीचा शासन विचार करत आहे.’’ राज्यात १२ जुलैपर्यंत संचारबंदी लागू आहे.
५ जुलैपासून ‘टिका (लसीकरण) उत्सव – १.२’
पणजी – राज्यात ५ जुलैपासून ‘टिका उत्सव – १.२’ला प्रारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. मुख्यमंत्री सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘राज्यात ५ जुलैपासून ‘टिका उत्सव – १.२’ला प्रारंभ होणार आहे. या वेळी ज्यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीची पहिली मात्रा घेऊन ८४ दिवस उलटले आहेत, त्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचसमवेत १८ वर्षांहून अधिक वय असलेल्यांना कोरोना लसीची पहिली मात्रा देणे चालूच रहाणार आहे.’
दिवसभरात १६९ कोरोनाबाधित, तर ७ मृत्यू
राज्यात दिवसभरात १६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात कोरोनाविषयक ३ सहस्र ५१३ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण ४.८१ टक्के आहे. दिवसभरात २०७ रुग्ण बरे झाले, तर २० रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या आता २ सहस्र १२९ झाली आहे.