पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणार्‍या स्त्रियांमुळे देशाची झालेली दुर्दशा !

१. पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणार्‍या स्त्रीला चांगली आणि हिंदु संस्कृतीचे आचरण करणार्‍या स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जाणे

आज मुलींना बालपणापासून हिंदु संस्कृतीचे महत्त्व शिकवले जात नसल्याने मुली आणि स्त्रिया यांच्याकडून धर्माचरण केले जात नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये असलेले देवीतत्त्व आणि चैतन्य यांचा र्‍हास होऊ लागला आहे. आज दूरचित्रवाणीवरील मालिका आणि चित्रपट यांच्या माध्यमातून पाश्चात्त्य संस्कृतीलाच उच्च संस्कृती ठरवून तिचे अनुकरण करणार्‍या स्त्रीला अधिक सुंदर, हुशार आणि प्रतिष्ठित मानले जाण्यावर भर दिला जात असल्यामुळे हिंदु संस्कृतीचे आचरण करणार्‍या साध्या स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जात आहे.

२. समाजात आंतरिक सौंदर्यापेक्षा बाह्य सौंदर्याला अधिक महत्त्व दिले जात असणे

आज समाजात आंतरिक साैंदर्यापेक्षा बाह्य सौंदर्याला अधिक महत्त्व दिले जात असल्याने स्त्रीजातीचा कल पाश्चात्त्य संस्कृतीचे आचरण करण्याकडे आहे, उदा. पुरुषांप्रमाणे वेशभूषा करणे, म्हणजे जीन्स, पँट घालणे, तोकडे कपडे घालणे, केस कापणे, दागिने न घालणे, दागिने घातले, तर ते सात्त्विक न घालता इतरांना आकर्षित करणारे घालणे. पुरुष अंगभर कपडे घालतात. स्त्रिया मात्र अल्प कपडे घालण्याला उच्च प्रतीचे सौंदर्य मानण्यातच धन्यता मानत आहेत. अल्प कपडे घातलेल्या स्त्रीकडे पहाण्यास पुरुषांनाही लाज वाटत असते. इतके स्त्रियांचे राहणीमान, सौंदर्याच्या संदर्भातील कल्पना खालच्या पातळीला चालली आहे. अशी आहे आजच्या स्त्रियांच्या सौंदर्याची दुर्दशा !

३. भारतीय स्त्री पाश्चात्त्य संस्कृतीचा स्वीकार करू लागल्यामुळे तिला जीवनात आनंद न मिळणे

आजची स्त्री पाश्चात्त्य संस्कृतीचा स्वीकार करू लागल्यामुळे प्रत्येक कुटुंबातील देवीतत्त्वाचे अस्तित्व संपुष्टात येऊ लागले आहे. त्यामुळे कलियुगातील बहुधा एकही कुटुंब सुखी आणि आनंदी नाही. त्याची उदाहरणे सर्वांच्या समोरच आहेत. आज घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. एकत्र कुटुंबपद्धती नष्ट झाल्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे. लहान मुलांना आईच्या प्रेमाची आवश्यकता असतांना त्यांना पाळणाघरात सोडून कुटुंब चालवण्यासाठी स्त्रीला नोकरी करावी लागत आहे. त्यामुळे स्त्रियांना मातृसुखाचा, तसेच एकत्र कुटुंबात जीवन जगण्याचा, तसेच नात्यांतून मिळणारा आनंद घेता येत नाही. त्यामुळे स्त्रीला स्वतःतील देवीतत्त्वाचा, तसेच परिपूर्ण स्त्री होण्याचा आनंद मिळत नाही.

४. स्त्रियांनी एकमेकींचा द्वेष, मत्सर केल्याने त्यांच्या वाट्याला दुःखच येणे

आज स्त्रियांना एकमेकांविषयी प्रेम आणि जवळीक वाटण्याऐवजी त्या एकमेकींचा द्वेष आणि मत्सर करतात. त्यामुळे स्त्रियांना एकमेकांचा आधार आणि प्रेम वाटण्याऐवजी एकमेकांपासून धोका वाटल्याने भीतीचे प्रमाण वाढले आहे. एका स्त्रीकडून दुसरी स्त्री दुखावली जाणे, एकमेकींशी स्पर्धा करून यश मिळवण्याचा प्रयत्न करणे, यांमुळे स्त्रियांना यश मिळाले आहे, त्यांचे स्वतःचे जीवन आनंदी झाले आहे, असे कधी पहायला मिळाले आहे का ? नाही ना ? उलट स्त्रियांनी एकमेकींना दुखावल्यामुळे त्यांच्या वाट्याला दुःख आल्याचीच उदाहरणे अधिक पहायला मिळतात. अशी झाली आहे, आज तुझ्या शक्तीरूप असलेल्या स्त्रीशक्तीची दुरावस्था.

५. स्त्रियांमधील देवीचे अस्तित्व नष्ट होऊ लागणे

एवढेच नव्हे, तर मुलगा हवा; म्हणून गर्भात मुलगी असेल, तर गर्भपात करून मुलीचे अस्तित्व संपवण्याचे पापही स्त्रियांकडूनच होत आहे. स्त्रियांमधील देवीतत्त्व नष्ट होऊ लागल्यामुळेच आज भारत देशाची अशी दुर्दशा होऊ लागली आहे.

हे भवानीआई, पृथ्वीवरील तुझे अस्तित्वच नष्ट झाले, तर आम्ही तुझ्याविना भिकारीच होणार ना ! एवढेच नव्हे, तुझी शक्ती नसल्यामुळे विश्वाचे कार्य चालवणार्‍या देवतांनाही अवघड होईल !

– एक साधिका