पुणे – सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्याची विक्री करण्यात आलेली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ जुलै या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचानालयाने (ईडी) अजित पवार यांच्या नातेवाइकांच्या कह्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘राज्यातील १४ साखर कारखान्यांच्या संदर्भात मुंबई येथील सुंदरबाग सोसायटीने वर्ष २००७ मध्ये उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ‘१४ साखर कारखान्यांना १ वर्षाची मुदत द्यावी. एका वर्षात जर त्यांनी रक्कम न भरता पैसे थकवले, तर ते विक्रीला काढा’, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार कायदेशीर प्रक्रिया राबवून आणि निविदा काढून साखर कारखान्यांची विक्री करण्यात आली. त्या १४ साखर कारखान्यांमध्ये जरंडेश्वर साखर कारखानाही होता. हा कारखाना विकत घेण्यासाठी १२ ते १५ आस्थापनांनी निविदा भरल्या होत्या; पण यामधील सर्वांत अधिक निविदा ‘गुरु कमॉडिटी’ या आस्थापनाने भरली होती. त्यांनी ६५ कोटी ७५ लाख रुपयांची बोली लावली आणि तो विकला गेला. अशाच प्रकारे विविध आस्थापनांनी इतर साखर कारखाने विकत घेतले होते.’’
जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्ती !अजित पवार म्हणाले, ‘‘गुरु कमॉडिटी’ने विकत घेतलेला कारखाना तो ‘बीव्हीजी ग्रुप’चे हनुमंत गायकवाड आणि माने यांनी ३० ते ३५ वर्षांसाठी चालवण्यासाठी मागितला होता. असे अनेक कारखाने चालवायला दिले जातात; पण त्यांना पहिल्याच वर्षी ५ कोटी रुपयांचा तोटा झाला. जरंडेश्वर शुगर मिल नावाने त्यांनी जे आस्थापन चालू केले होते, ते नंतर माझे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांनी ते चालवायला घेतले; पण नंतरच्या काळातही तोटा झाला. नंतर रितसर अनुमती घेत त्याचा विस्तार करण्यात आला. यासाठी रितसर कर्ज घेण्यात आले असून ते फेडलेही जात आहे.’’ ‘‘ईडी’कडून ‘गुरु कमॉडिटी’च्या संदर्भात काहीतरी चौकशी चालू असतांना कारखान्यावर टाच आणली आहे. कारखाना ‘गुरु कमॉडिटी’च्या नावे असला, तरी जरंडेश्वर शुगर मिल चालवत आहे. या आस्थापनाशी माझा काही संबंध नसल्याने मी माहिती घेतलेली नाही; पण कारवाई झाली आहे. ‘ईडी’ला चौकशीचा अधिकार आहे. मागे इतर अनेक संस्थांनी चौकशी केल्या असून त्यातून काही निष्पन्न झालेले नाही. जरंडेश्वर न्याय मागण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे जाईल. अनेक शेतकरी आणि आणि कामगार यांचे काम त्या कारखान्यावर अवलंबून आहे’’, असे पवार यांनी सांगितले. |