‘एकदा आम्ही गोवा ते पुणे चारचाकीने प्रवास करत होतो. त्या वेळी सद्गुरु पिंगळेकाका माझ्या शेजारच्या आसनावर बसले होते. हा ४०० कि.मी.चा प्रवास होता, तरी मला त्या वेळी अजिबात थकल्यासारखे वाटले नाही. ‘स्टेअरिंग’वर हात असतांना ‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण पकडले आहेत’, असे मला सद्गुरु पिंगळेकाका यांच्यामुळे जाणवत होते. सद्गुरु पिंगळेकाका यांच्या सहवासात जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. सकारात्मकता
शहरात पोचल्यावर ‘गूगलमॅप’ने घरी जाण्याचा अयोग्य मार्ग दाखवला. तेव्हाही सद्गुरु पिंगळेकाका ‘गूगल’प्रती सकारात्मक दृष्टीने पहात होते.
२. सद्गुरु काकांच्या अस्तित्वाने पक्षी आकर्षित होणे
आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो, त्या ठिकाणी प्रतिदिन झाडावर गरुड येऊन आम्हाला दर्शन देत होता. पोपटही झाडावर येऊन बसत होते. तेव्हा ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायचे. सद्गुरु पिंगळेकाकांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘ज्या ठिकाणी सात्त्विकता असते, तेथे असे होते.’’ वास्तविक सद्गुरु पिंगळेकाकांच्या अस्तित्वानेच असे होत होते.
३. व्यावहारिक विषयांच्या संदर्भातही आध्यात्मिक स्तरावर विचार ठेवणे
सद्गुरु पिंगळेकाकांच्या भावाने नवीन चारचाकी घेतली आहे. आम्ही त्या चारचाकीने प्रवास करत होतो. त्या चारचाकीत एक सुविधा अशी आहे की, ‘गूगल असिस्टंट’ला (भ्रमणभाष वरील कृती करण्यास साहाय्य करणारे स्वयंचलीत तंत्रज्ञान) काही प्रश्न विचारला, तर ते लगेचच उत्तर देते. त्या वेळी सद्गुरु पिंगळेकाका म्हणाले, ‘‘इतके चांगले आज्ञापालन करणारे अजून कुणी नाही.’’
४. साधकांना आश्रमातील कार्यपद्धतींचे महत्त्व सांगणे
सद्गुरु पिंगळेकाका प्रत्येक वेळी आश्रमातील कार्यपद्धतींचे पालन करण्याचे महत्त्व सांगतात. ‘आपली प्रत्येक कृती आश्रमाच्या कार्यपद्धतीनुसारच व्हायला हवी. आपल्यामुळे आश्रमातील उत्तरदायी साधकांना काही अडचण यायला नको’, असे ते सांगतात. एकदा घरी इस्त्री करतांना माझी पत्नी सौ. वैदेहीने (सद्गुरु काकांच्या कन्येने) खाली काही न घेता आणि इस्त्रीचे तापमान न बघता खाली जी सतरंजी आणि गालीचा होता, त्यावर इस्त्री करायला घेतली. तेव्हा तिचा पोशाख थोडासा जळला. तेव्हा सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितले, ‘‘आपल्याला आश्रमात ज्या कार्यपद्धती घालून दिल्या आहेत, त्याचे पालन सर्व ठिकाणी व्हायला हवे.’’
५. सद्गुरु पिंगळेकाका सत्संग किंवा अन्य कार्यक्रम यांसाठी वेळेच्या ५ मिनिटे आधी उपस्थित असतात.
६. आपत्कालीन विषयांच्या संदर्भात सतर्क असणे
सद्गुरु पिंगळेकाका प्रत्येक वेळी आम्हाला आपत्काळाविषयी सांगतात आणि आमच्या मनाची सिद्धता करवून घेतात. त्यांनी सांगितले, ‘‘आगामी ३ वर्षांत आपली भेट होईल कि नाही’, हे ठाऊक नाही. त्यामुळे तुमचे मार्गदर्शक पू. रमानंद गौडा यांचे तुम्ही आज्ञापालन करा.’’ त्यांनी पू. रमानंदअण्णांना सांगितले, ‘‘मी या ३ जणांना (मी (गुरुप्रसाद), वैदेही आणि पत्नी सौ. मधुवंती यांना) तुमच्या चरणी अर्पण करतो.’’
७. भाव
७ अ. ‘सर्व काही परात्पर गुरुदेवांच्या कृपेने होत आहे’, या भावात असणे : एकदा मी सद्गुरु पिंगळेकाकांना सांगितले, ‘‘तुमची खोली आणि ध्यानमंदिर यांत काही भेद वाटत नाही. तुमच्या खोलीत नामजप चांगला होतो.’’ त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘परात्पर गुरुदेवांची प्रभावळ (ऑरा) १०० मीटर आहे. त्यामुळे असे होते.’’ तेव्हा मला त्यांची भावस्थिती अनुभवता आली. मी हा प्रसंग एका संतांना सांगितला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘त्यांचा असा विचार असतो; म्हणूनच ते संत आहेत.’’
७ आ. दास्यभाव : सद्गुरु पिंगळेकाका सतत दास्यभावात असतात. त्यांचे बोलणे आणि कृती यांतून नम्रता व्यक्त होते. त्यांच्या वाणीत एक प्रकारची मधुरता आणि बोलण्यात अंतर्मुखता असते. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना साधकांची भावजागृती होते. सद्गुरु पिंगळेकाका साधकांना त्यांच्या आचरणातून शिकवतात. त्यांच्या सहवासात आम्हाला दास्यभावाची अनुभूती येते.
केवळ आणि केवळ गुरुदेवांच्या कृपेने मला सद्गुरु पिंगळेकाकांच्या सत्संगात रहाण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. गुरुप्रसाद गौडा (जावई), मंगळुरू (२७.११.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |