‘देव भावाचा भुकेला असतो’, याची नाशिक येथील श्री. मुकुंद ओझरकर यांना आलेली प्रचीती !
‘वर्ष १९९९-२००० मधील हा अनुभव आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त स्मरणिका प्रकाशित करण्याचे हे दुसरे वर्ष होते. या वेळी मी स्मरणिकेची सेवा स्वीकारली. ‘संगणकीय संरचना पूर्ण झाल्यावर स्मरणिका छपाईच्या कारखान्यात देणे आणि छपाई झाल्यावर स्मरणिकेच्या प्रती जिल्ह्यात देणे’, असे माझ्या सेवेचे स्वरूप होते.
१. गुरुपौर्णिमा स्मरणिकेची सेवा करतांना आलेल्या अडचणी
१ अ. स्मरणिकेची संरचना करण्यासाठी संगणक उपलब्ध होण्यात अडचण येणे : समाजातील एक व्यक्ती स्मरणिकेची संरचना सेवा म्हणून करणार होती. त्या व्यक्तीला घरून विरोध असल्यामुळे ती स्वतःच्या संगणकावर सेवा करणार नव्हती. तिला अन्य संगणक उपलब्ध करून देण्याचे ठरले. तेव्हा संगणक उपलब्ध होणे कठीण होते. देवाच्या कृपेने एका साधकाने ‘त्यांच्याकडील संगणक रात्रीच्या वेळी उपलब्ध करून देईन’, असे सांगितले. संरचना करणारी व्यक्ती व्यावसायिक होती. त्यामुळे ती ८ ते १५ दिवसांत सेवा पूर्ण करू शकणार होती.
१ आ. संगणकीय सेवा करणार्या व्यक्तीला रात्री चहापाणी लागल्यास ते देण्यासाठी त्याच्या समवेत रहाणे आणि ८ दिवसांनी त्या व्यक्तीने सेवेला यायला जमणार नसल्याचे सांगणे : तिची संगणकीय सेवा चालू झाली. माझ्या घराजवळच सेवेचे स्थळ होते आणि सेवा करणारी व्यक्ती समाजातील होती. त्यामुळे तिला रात्री चहापाणी लागले किंवा सेवा करतांना तीला कंटाळा आल्यास तिला पुन्हा सेवेला उद्युक्त करण्यासाठी मी तिच्या समवेत रहाण्याचे ठरवले. माझ्या समवेत अजून एक साधक ‘ही सेवा कशी करतात ?’, हे पहाण्यासाठी येत होते. ही सेवा ८ दिवस व्यवस्थित चालू होती. नंतर संरचना करणार्या व्यक्तीने उद्यापासून सेवेला यायला जमणार नसल्याचे सांगितले.
१ इ. दोघांनी सेवेचे कठीण आव्हान स्वीकारणे; परंतु सेवेचे वाढलेले घंटे पाहून संगणक देणार्या साधकाच्या वडिलांनी संगणक उपलब्ध करून द्यायला नकार देणे : त्या वेळी सेवा अपूर्ण झाली होती. आम्हाला ही सेवा नवीन होती. आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. आम्हाला त्या सेवेची जेवढी माहिती होती, तेवढी जिल्ह्यातील अन्य साधकांना नव्हती. मला ‘संरचना कशी असावी ?’, हे ठाऊक होते; परंतु मला संगणक येत नव्हता. माझ्या समवेत असणारा साधक श्री. सुमंत वैद्य याला संगणक येत होता; पण त्याला संरचनेची काहीच माहिती नव्हती. ‘अपूर्ण सेवा पूर्ण कशी करायची ?’, याचे ज्ञान आम्हाला नव्हते. त्यामुळे आम्ही दोघे स्तंभित झालो. तेव्हा श्री. सुमंत वैद्य म्हणाला, ‘‘काका, तुम्हाला संरचना येते आणि मला संगणक येतो, तर आपण दोघे मिळून ही सेवा पूर्ण करूया का ?’’ ते आव्हान कठीण होते, तरी आम्ही (सकाळी १० वाजल्यापासून ते दुसर्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत) शर्थीने प्रयत्न चालू केले. आमचे सेवेचे वाढलेले घंटे पाहून संगणक देणार्या साधकाचे वडील आमच्यावर नाराज झाले आणि त्यांनी यापुढे संगणक देणार नसल्याचे सांगितले.
१ ई. एका आधुनिक वैद्यांच्या रुग्णालयात संगणक उपलब्ध होऊन गुरुपौर्णिमेला स्मरणिकेची छपाई पूर्ण होणे : आम्ही ही अडचण जिल्ह्यातील साधकांना सांगितली. तेव्हा एक आधुनिक वैद्य सेवेत होते. त्यांच्या रुग्णालयात संगणक होता. त्यांनी तो संगणक सेवेसाठी द्यायला अनुमती दिली. आमची शेष असलेली १० ते १५ टक्के सेवा पूर्ण झाली. स्मरणिका छपाईसाठी पाठवली. गुरुपौर्णिमेला स्मरणिका छापून आली. आम्हाला ही स्मरणिका तपासायची होती. ‘काही राहिले आहे का ?’, ते बघायचे होते. नंतर आम्ही सेवेसाठी पुन्हा रुग्णालयात गेलो.
२. गुरुदेवांना स्मरणिका दाखवल्यावर त्यांनी ती हातात घेऊन छान जमल्याचे सांगणे
प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) गुरुपौर्णिमेसाठी इंदूर येथे जाणार होते. ते देवद आश्रमात जातांना नाशिकला आले. तेव्हा आम्ही रुग्णालयात स्मरणिकेसंबधी सेवा करत होतो. प.पू. गुरुदेव त्याच रुग्णालयात शारीरिक तपासणी करून घेण्यासाठी आले होते. हे आम्हाला उशिरा समजले, तरी आम्ही दोघे त्यांच्यासमोर गेलो. तेव्हा सुमंत हळूच मला म्हणाला, ‘‘त्यांना स्मरणिका दाखवायची का ?’’ माझ्या मनाची सिद्धता नव्हती; कारण ती स्मरणिका मी बघितली नव्हती. तेव्हा मी त्याला म्हणालो, ‘‘हे बघ. माझे धाडस होत नाही. तुला दाखवायची असेल तर दाखव.’’ त्याने प.पू गुरुदेवांना स्मरणिका दाखवली. त्यांनी ती हातात घेतली आणि माझ्या छातीत धडधड होऊ लागली. प.पू गुरुदेवांनी स्मरणिका उघडली नाही; परंतु त्यांनी ती मागून-पुढून न्याहाळली आणि ते म्हणाले, ‘‘अरे वा, छान जमलीय !’’ त्यांनी स्मरणिका परत केली. तेव्हा सुमंतच्या तोंडवळ्यावर आनंद ओसंडत होता.
३. ‘आम्हाला काही येत नसतांना आम्ही जीव ओतून सेवा पूर्ण केल्याने गुरुदेवांनी आमचे कौतुक केले’, असे लक्षात येणे
आमची त्यांच्या समवेतची भेट संपली आणि गुरुदेव नियोजनाप्रमाणे पुढे गेले. नंतर मी स्मरणिका हातात घेतली आणि एक-एक पृष्ठ पाहू लागलो. तेव्हा मला प्रत्येक पृष्ठावर चार चुका आढळल्या आणि मी स्तंभित झालो. ‘प.पू. गुरुदेवांनी आमचे कौतुक कसे केले ?’, याविषयी चिंतन चालू असतांना माझ्या लक्षात आले, ‘आम्हाला काहीही येत नसतांना आम्ही सेवा पूर्ण करण्याचा जीव ओतून प्रयत्न करत होतो. गुरुदेवांनी त्याला गुण दिले आहेत.’
नंतर अनेक वर्षांनी एका लेखात या प्रसंगासारखा प्रसंग होता. तेव्हा माझा जीव भांड्यात पडला आणि प.पू. गुरुदेवांना ‘साधकांकडून काय अपेक्षित आहे ?’, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. भावजागृतीचे प्रसंग पुनःपुन्हा घडत असतात, ते असे ! ’
– श्री. मुकुंद ओझरकर, नाशिक (२५.३.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |