सातार्‍यात थकीत वीजदेयकांमुळे ‘ग्रामपंचायत’ विरुद्ध ‘महावितरण’ संघर्ष


सातारा, १ जुलै (वार्ता.) – थकीत वीजदेयकांमुळे महावितरणने ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची विद्युत् जोडणी तोडण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे ग्रामपंचायतींनी महावितरणचे गावाच्या सीमेत असणार्‍या विद्युत् खांब आणि ‘ट्रान्सफॉर्मर’ आदींचेही भाडे द्यावी, अशी मागणी महावितरणकडे केली आहे. यामुळे ग्रामपंचायत विरुद्ध महावितरण असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महावितरणने थकीत वीजदेयकांमुळे कराड तालुक्यातील उंब्रज ग्रामपंचायतीची विद्युत् जोडणी तोडली आहे. यामुळे संपूर्ण गाव अंधारात आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी वीज वितरण कार्यालयासमोर चर खोदून प्रवेशद्वाराला कुलूप लावले आहे. तसेच नळ जोडणीही तोडण्यात आली आहे. यामुळे महावितरण आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात जोरदार वादावादी झाली. आता हे लोण संपूर्ण जिल्हाभर पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर सरकारने तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. (प्रशासनातील दोन संस्थांनी असे वाद निर्माण करण्यापेक्षा सामंजस्याने तोडगा काढणे अपेक्षित आहे. अन्यथा समाजात चुकीचा संदेश जाऊन अराजक निर्माण होऊ शकते. – संपादक)