तमिळनाडूतील प्रसिद्ध पलानी मंदिराच्या संपत्तीचे प्रकरण
आज देशातील सहस्रो मंदिरांवर सरकारांनी नियंत्रण मिळवले आहे आणि या संपत्तीचा वापर हिंदु धर्मासाठी करण्याऐवजी अन्य कामांसाठीच केला जात असल्याने याकडेही माननीय न्यायालयाने लक्ष देऊन ही संपत्ती हिंदु धर्मासाठी खर्च होण्यासाठी प्रयत्न करावा, असे हिंदु भाविकांना वाटते !
चेन्नई (तमिळनाडू) – कायद्याच्या हिशोबाने मंदिरातील मूर्ती एका लहान मुलाप्रमाणे आहेत. लहान मुलांच्या संपत्तीचे रक्षण न्यायालयालाच करायला हवे, असे मद्रास उच्च न्यायालयाने राज्यातील प्रसिद्ध पलानी मंदिराच्या भूमीवरील वादाविषयीच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी म्हटले. या भूमीवर काही कुटुंबांनी अवैध नियंत्रण मिळवले होते. त्यांना तेथून काढण्याचा आदेश न्यायालयाने या वेळी दिला. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिराची संपत्ती या कुटुंबियांनी नियंत्रणात घेतली होती. न्यायालयाने अधिकार्यांना ४ आठवड्यांमध्ये मंदिराची संपत्ती रिकामी करावी, असा आदेश दिला आहे.
१. न्यायालयाने ज्या संपत्तीविषयी निर्णय दिला, ती संपत्ती ब्रिटिशांनी वर्ष १८६३ मध्ये बक्षीस म्हणून काही लोकांना दिली होती. ‘आमच्या अनेक पिढ्यांचा या भूमीवर मालकी अधिकार आहे’, असा या कुटुंबियांनी न्यायालयात दावा केला होता. तसेच या भूमीचे भाडेही मंदिराला देत असल्याचे सांगितले होते. त्यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, तुम्ही या भूमीचे मालक नाही, तर भाडेकरू आहात. यामुळे या संपत्तीच्या कोणत्याही भागावर मालकी हक्काचा दावा केला जाऊ शकत नाही.
२. आयुक्तांना या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. ही भूमी ६० एकरापेक्षा अधिक आहे. तिरुपूर येथील धारापुरम्मध्ये पेरियाकुमारापलयम् गावात ही भूमी आहे. या संपत्तीवर मंदिरातील देवता मुरुगन स्वामी यांचा अधिकार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या मंदिराचे संपूर्ण नाव ‘पलानी अरुल्मिगु धनदायुथपानी स्वामी मंदिर’ असे आहे. तमिळनाडूमधील सर्वांत श्रीमंत मंदिरांपैकी हे एक असून हे प्राचीनही आहे.