‘स्मार्ट सिटी’च्या कामांना मार्च अखेरची मुदत, अन्यथा संमत झालेला निधी परत केंद्रशासनाकडे जाणार ! – कुणालकुमार, उपसचिव, स्मार्ट सिटी अभियान

‘स्मार्ट सिटी’ योजना गेली ५ वर्षे कुठे कुठे आणि कोणत्या कारणांमुळे रखडली याचा अभ्यास जनतेसमोर आला पाहिजे आणि संबंधित अधिकार्‍यांना याविषयी जाब विचारला गेला पाहिजे !

संभाजीनगर – येत्या मार्चअखेर ‘स्मार्ट सिटी प्रकल्पा’तील प्रस्तावित कामे पूर्ण करा, अन्यथा संमत झालेला निधी परत जाईल. योजनेचा ५ वर्षांचा काळ पूर्ण होत आला आहे. त्याला मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे जे प्रकल्प ‘डी.पी.आर्.’ स्तरावर आहेत त्यांच्या निविदा काढा. जे प्रकल्प निविदास्तरावर आहेत, त्या प्रकल्पांच्या कामांना आदेश द्या आणि ज्या कामांचे आदेश मिळालेले आहेत, ते प्रकल्प तातडीने पूर्ण करा, अशा सूचना स्मार्ट सिटी अभियानाचे उपसचिव कुणालकुमार यांनी २१ जून या दिवशी व्हिडिओ परिषदेद्वारे दिल्या.
‘स्मार्ट सिटी’ मंडळाचे मुख्याधिकारी आणि राज्याचे मुख्य सचिव यांची त्यांनी बैठक घेतली. त्यात त्यांनी ‘‘स्मार्ट सिटी’चा ‘फेज टू’ येणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले’, अशी माहिती येथील महापालिकेचे प्रशासक तथा संभाजीनगर ‘स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’चे मुख्याधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

संभाजीनगरसह ठाणे, कल्याण- डोंबिवली, नाशिक, अमरावती, सोलापूर, नागपूर, पुणे, पिंपरी- चिंचवड या शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ अभियानात समावेश करण्यात आला आहे.’’