नवी देहली – कोरोना अजून गेलेला नसून तो रंग पालटत आहे, अशी चेतावणी देशभरातील आधुनिक वैद्यांची शिखर संघटना असलेल्या ‘अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थे’चे म्हणजे ‘एम्स्’चे प्रमुख डॉ. नवनीत विग यांनी नागरिकांना दिली. देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने अनेक राज्यांकडून दळणवळण बंदी शिथिल केली जात आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. नागरिक मास्क लावण्यासारखा मूलभूत नियमही पाळतांना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर डॉ. विग यांनी नागरिकांना वरील चेतावणी दिली.
डॉ. विग पुढे म्हणाले, ‘‘आपण सतर्क रहायला हवे. लोकांनी स्वच्छ मास्क घालायला हवेत, तसेच लवकरात लवकर स्वतःचे लसीकरण करून घ्यावे आणि कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे. जर कोरोनाची तिसरी लाट आली, तर आपण कुणाला दोषी धरणार आहोत ? आपल्याला प्रत्येक जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) १ टक्क्याहून न्यून करण्याच्या दृष्टीने आपली धोरणे आखली पाहिजेत अन् त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. यासह प्रत्येक जिल्ह्यात किमान ५० टक्के ‘ऑक्सिजन बेड’ रिकामे असायला हवेत.’’