सांगली, १९ जून – पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक राज्याने पाण्याची आवक-जावक, तसेच पाणीसाठा यांसाठी आलमट्टी धरणावर आधुनिक रियल टाईम डाटा यंत्रणा बसवावी, अशी सूचना कर्नाटक शासनास करण्यात आली होती. ही सूचना कर्नाटकाने मान्य केली आहे, अशी माहिती सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. संभाव्य पूरस्थितीवरील उपाययोजनांविषयी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी बेंगळुरू येथे १९ जून या दिवशी बैठक झाली. या बैठकीस दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव, तसेच पाटबंधारे अधिकारी उपस्थित होते.
सांगली, सातारा, कोल्हापूर भागात महापुराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जयंत पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक घेण्यात आली होती. बैठकीनंतर जयंत पाटील म्हणाले, दोन्ही राज्यांनी येत्या पावसाळ्यात समन्वयाने पूर परिस्थितीवर मात करण्याचे ठरवले आहे. कर्नाटकने रियल टाईम डाटा यंत्रणा बसवण्याचे मान्य केल्याने आलमट्टी धरणातील आवक-जावक याची माहिती दोन्ही राज्यांना मिळेल. आलमट्टीपुढील नारायणपूर येथील बंधार्यापर्यंत पुराच्या पाण्याचे नियंत्रण करणे शक्य होणार आहे.
महाराष्ट्राकडून कर्नाटकला उन्हाळ्यात ४ टी.एम्.सी. पाणी देण्याचा निर्णय !
उन्हाळ्यात कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती उद्भवते. त्यामुळे महाराष्ट्राने कोयना धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी कर्नाटकने या बैठकीत केली. त्यावर प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात महाराष्ट्राकडून कर्नाटकला ४ टी.एम्.सी. पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. महाष्ट्रातील दूधगंगा प्रकल्प कर्नाटकसाठी महत्त्वाचा असून तो प्रकल्प २ वर्षांत पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.